नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या अवधीनंतर कुठे वाजू लागले. यावर प्रस्थापित तसेच विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्याची तयारी करत असतानाच पुन्हा एकदा कोरोना नावाच्या महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी निवडणूक संदर्भात कार्यक्रम चालू असतानाचा त्यासारखाच प्रकार कोरोनामुळे पुन्हा सुरू झाल्याने नियोजित निवडणूक प्रक्रियेवर कोरोनाचे सावट प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले आहे.
२०२० या वर्षीच्या सुरुवातीपासून सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमाला जोर धरू लागला होता. त्यावेळी मतदार यादीचे सर्व काम पूर्णत्वास जाऊन प्रसिद्ध केल्या गेल्या. प्रभाग रचनादेखील जाहीर झाली. मतदानाचा कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा केली जात असतानाच कोरोनाच्या पहिल्या लाटेस प्रारंभ झाला. त्यानंतर कोरोना महामारीचा धसका निवडणूक आयोगाने घेत निवडणूक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबवण्याचे आदेश दिले गेले. मागील दोन वर्षांत निवडणुकीसंदर्भात अनेक निर्णय झाले.
परंतु आलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेने निवडणुकी घेण्याविषयीचे निवडणूक आयोगाचे प्रयत्न अपयशी ठरले गेले. २०२२च्या सुरुवातीपासून कोरोना महामारीचे प्रमाण नियत्रंणात येऊ लागले. कोरोना नियत्रंणात येताच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालीही सुरू झाल्या; परंतु देशात, राज्याच्या इतर भागात पुन्हा एकदा कोरोनाने उचल घेतल्याने त्याचा प्रभाव दररोज आकडेवारीतून पुन्हा दिसू लागला.
मागील आठवड्यात मंगळवारी निवडणूकीच्या दृष्टीने नव्याने प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता त्यावर आलेल्या आक्षेपावर कार्यवाही केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. बाकी कोरोनाचा संसर्ग वाढत असताना निवडणूक आयोगाकडून ज्या सूचना येतील. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. – अमरीश पटनिगिरे, उपायुक्त, निवडणूक विभाग
मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरात बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण संसर्गित होत आहेत. शुक्रवारी ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ६३ रुग्ण संसर्गित झाले. यावरून कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी बोटावर मोजण्याइतपत रुग्णसंख्या होती. समाधानाची बाब म्हणजे मृत्यूसंख्या २०४९ या जुन्याच आकड्यावर स्थिर आहे.
२०२० मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि प्रभाग रचना जाहीर झाली आणि कोरोनाची पहिली लाट सुरू झाली. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया थांबविली गेली होती. आताही २०२२ मध्ये दुसऱ्यांदा प्रभाग रचना जाहीर झाली व कोरोनाने डोके वर काढले. हा योगायोग म्हणावा लागेल.