Sunday, August 24, 2025

कोकण रेल्वे मार्गावर ‘स्वयंचलित पर्जन्यमापक’

कोकण रेल्वे मार्गावर ‘स्वयंचलित पर्जन्यमापक’

खेड (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे पावसाळ्यात सुरक्षितपणे धावण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या कोकण रेल्वेने पावसाळी हंगामाची तयारी केली असून हंगामासाठीचे नवीन वेळापत्रकही निश्चित केले आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग काहीसा मंदावणार आहे. कोकणातील पाऊस आणि डोंगर-दऱ्यांचा प्रदेश यांचा विचार करता हा निर्णय दरवर्षी घेतला जातो. विशेष म्हणजे, मार्गाच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी कोरेच्या माणगाव ते उडपी दरम्यान ९ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत.

चार महत्त्वाच्या पुलांवर वायुवेग नोंदविणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्ग पावसाळी प्रवासासाठी आणखी सुरक्षित बनला आहे. मागील नऊ वर्षांत कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. यंदा कोकण रेल्वेकडून २४ तास गस्तीसाठी ८४६ जणांची नियुक्ती केली आहे. शिवाय १० जूनपासून गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत. रेल्वे रुळांच्या शेजारी असणारी गटारे आणि रुळांच्या कामांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे.

पावसाळ्यामध्ये काही वेळा दृश्यमानता देखील कमी होते. त्यासाठी ज्या ठिकाणी दृश्यमानता कमी असेल अशा भागात किंवा ठिकाणी ४० किमी प्रति तास इतक्या वेगाने गाड्या चालवाव्यात, अशा सूचनादेखील पायलटना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे वैद्यकीय मदतीसाठी सेल्फ प्रोपेल्ड एआरएमव्ही तर वेर्णा येथे अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन सज्ज ठेवण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रत्येक स्टेशन्सवर वायरलेस संपर्क साधता येईल, याची व्यवस्था केली गेली आहे. मुख्य म्हणजे इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेटस सरासरी एक किमी अंतरावर असणार आहेत.

कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. हीच बाब लक्षात घेत नेमका किती पाऊस झाला यासाठी माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उड्डपी या स्टेशन्सवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात आली आहेत. तर, रत्नागिरी निवसर स्थानकांदरम्यान पानवल पुलावर, मांडवी पूल, झुआरी ब्रीज आणि शरावती ब्रीज या ठिकाणी वाऱ्याचा वेग नोंदवणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे.

Comments
Add Comment