डॉ. लीना राजवाडे
षडरसांपैकी शेवटचा रस तुरट किंवा कषाय या विषयी आजच्या लेखात जाणून घेऊ.
कषाय: जडयेत् जिव्हाम् – तुरट रस खाल्यास जीभ जड होते. एवढेच नव्हे तर गळ्यातही ओढ बसते. तुरट रसात पृथ्वी आणि वायू या दोन महाभुतांचे आधिक्य असते. त्यामुळे रुक्ष, गुरू या गुणांनी तुरट रसाची द्रव्ये काम करतात.
कषाय: शोषण: शरीरात तयार होणारा क्लेद शोषून घेणारा हा रस आहे.·पित्त कफ हा, अस्रविशोधन: पित्त आणि कफातील फाजील वाढलेला द्रव अंश तुरट रस शोषून घेतो. त्यामुळे रक्ताला प्राकृत स्थितीत ठेवतो.जखम झाल्यास त्यातील पूयादि स्राव कमी करणारा हा रस आहे. या रसाचे प्रमाणात सेवन न झाल्यास काय होते याचाही निर्देश शास्त्र संहितांमध्ये आहे.
अत्त्युपयोगाद् कषायो रस: आस्यं शोषयति। सुपारीसारखे तुरट पदार्थ खाल्यावर तोंडाला कोरड पडते. ·उदरं आध्मापयति – पोटात गुबारा धरतो किंवा पोट फुगते.
मलमूत्ररेतसो अवगृह्याति – मल, मूत्र, शुक्र शरिराबाहेर पडताना अडथळा निर्माण होतो. तुरट रसाचे पदार्थ कात, हिरडा, बेहडा, खजूर, मध, कमळतंतू आहार रस ही कल्पना एव्हाना किती व्यापक आहे, हे लक्षात आले असेल. आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येक माणसाने स्वत:ला मानवतील किंवा सोसवतील एवढ्याच प्रमाणात सहा रसांचे पदार्थ खावेत.
आजची गुरुकिल्ली
सर्वरसाभ्यासो बलकराणां श्रेष्ठम् सर्व सहा रसांचे योग्य प्रमाणात पदार्थ खाणे हे ताकद मिळवून देण्यास श्रेयस्कर आहेत.
यापुढील लेखातून जाणून घेऊ, आहार वर्ग आणि बरंच काही…