मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय बनली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा ह्या बहुतांशी ऑनलाईन सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच फारच कमी काळासाठी विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामुळे आतातरी नव्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेत सुरू होऊन वर्षभर व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण होईल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांसाठी एसओपी जारी करण्यात येईल. १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेण्यात येईल. तसेच शिक्षण विभाग शाळांकरता नवीन कोविड नियमावली जारी करणार, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनामुळे शाळा दीर्घ काळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता अवघे काही दिवस राहिले आहेत. कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळांबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.