Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकलाकारही असतो माणूस...

कलाकारही असतो माणूस…

दीपक परब

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहलता वसईकर आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील वेगवेगळ्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते. स्नेहलताची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील ‘महाराणी सोयराबाई’ यांची भूमिका चांगलीच गाजली व ती घराघरांत पोहोचली होती. मात्र, यानंतर तिने केलेल्या काही फोटोशूटमुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याला स्नेहलतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. स्नेहलता वसईकर हिने फोटो शेअर करून ट्रोल करणाऱ्यांसाठी एक पोस्ट लिहिली असून या पोस्टमधून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

स्नेहलता म्हणते, ‘नमस्कार मी स्नेहलता वसईकर, अर्थातच अभिनेत्री असल्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून मी आपल्या समोर येत असते. माझ्या प्रत्येक भूमिकेवर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले… काही चुकले, तर तुम्ही समजूनही घेतलेत. ऐतिहासिक भूमिकांपासून मॉडर्न भूमिका असा प्रवास मी केला. प्रत्येक भूमिकेतून, अनुभवांमधून खूप गोष्टी शिकले. अजूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत व त्यातूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत… पण काय सांगू…? कधी-कधी असेच कमरेवर हात ठेऊन या ट्रोलर्सबरोबर भांडवे असे वाटते… त्यांना सांगावेसे वाटते, तुमच्यावरील ‘संस्कार’ तुमच्या कपड्यांवरून नाही, तर तुमच्या विचारांमधून कळतात. थोरा-मोठ्यांचे गुण आपल्या अंगी उतरवायचे असतात व त्यातील अनेक गोष्टी आचरणात आणायच्या असतात…

तुम्हा सुज्ञ प्रेक्षकांना माझी बाजू समजवून सांगण्याची तशी फार गरज नाही हे मला ठाऊक आहे… फक्त, आम्ही कलाकारही माणूस असतो…वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी भुकेलेलो असतो… कलाकार हा आशावादी सुद्धा असतो. मी एक कलाकार आहे आणि माझे एक खासगी आयुष्यसुद्धा आहे हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा करते. ऐतिहासिक मालिकेमधून भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असतो आणि ते थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे आपण नव्हे याचे भानही राखायचे…आम्ही कलाकार फक्त निमित्तमात्र असतो. जर अशा भूमिका साकारल्यानंतर त्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या जागी जर तुम्ही आम्हाला नेऊन बसवत असाल, तर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा याहून मोठा अपमान दुसरा नसेल. पुन्हा सांगते मी रील आणि रिअल लाइफ ही वेगवेगळी ठेवणेच पसंत करते.’ स्नेहलताच्या या भावनांचा आपण आपण आदरच करायला हवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -