Categories: कोलाज

जैवविविधतेचे एक मोठे स्थान – देवराई

Share

सतीश पाटणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीवर असलेल्या दुर्मीळ मायरिस्टिका स्वॅम्पचे जंगल जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. वन विभागाने जैविक विविधता कायद्याअंतर्गत या जंगलाला हा दर्जा दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी या मायरिस्टिका स्वॅम्पच्या देवराईचे संरक्षण केले असून महाराष्ट्रात आढळणारे मायरिस्टिका स्वॅम्पचे हे एकमेव जंगल आहे. भारतात केवळ तीन राज्यांमध्ये मायरिस्टिका स्वॅम्पचे जंगल आढळून येते.

मायरिस्टिका स्वॅम्प ही गोड्या पाण्यातील दलदलीच्या जंगलाची परिसंस्था महाराष्ट्र केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्तिवात आहे. या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून या जंगलाचे जतन गावकऱ्यांनी देवराईच्या स्वरूपात केले आहे. २०१८ मध्ये या देवराईची पहिली नोंद गायत्री श्रीधरन आणि मल्हार इंदुलकर या अभ्यासकांनी केली. सद्यस्थितीत  हेवाळे ग्रामस्थांच्या जॉईन्ट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून या जागेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येते.  हेवाळे-बांबर्डे या गावांच्या हद्दीवर असलेल्या या जंगलाला कान्हळाची राई देखील म्हटले जाते. ही जंगली जायफळाची झाडे बहुसंख्याने असलेली गोड्या पाण्याची दलदल परिसंस्था आहे. ही परिसंस्था अत्यंत दुर्मीळ असून अशा परिसंस्थांचे वय साधारण १४० दशलक्ष वर्षे इतके आहे. महाराष्ट्रातील आजवर माहीत असलेला हा एकमेव गोड्या पाण्याच्या दलदलीचा अधिवास असून यातून अनेक बारमाही जिवंत झरे वाहत असतात. पश्चिम घाट या जैवविविधतेत समृद्ध पट्ट्यात ही राई सर्वात उत्तरेकडील राई आहे. कान्हाळाची राई ही हेवाळे बांबर्डे परिसरातील स्थानिकांनी शतकानुशतके राखलेली देवराई आहे. यातील झाड शिमग्यासाठी, होळीसाठी पवित्र मानले जाते.

कोकणातील जैवविविधतेचे एक मोठे स्थान म्हणजे देवराया. वनराईचे रक्षण व्हावे, या उद्देशाने पूर्वसुरींनी काही जंगले राखून ठेवली. असे जंगल म्हणजेच देवराई. काही अपवाद वगळता कोकणातील जवळपास प्रत्येक गावात अशी देवराई आहे. त्यांची व्याप्ती एकरपासून काही हेक्टरपर्यंत पसरलेली आहे. या देवरायांमध्ये अत्यंत उपयुक्त नि दुर्मीळ वृक्ष-वेली आढळतातच आणि त्याचबरोबर पक्षी, प्राणी, फुलपाखरे, बुरशी, शेवाळ अशा सर्व प्रकारच्या सजीवांची विविधताही तेथे आढळते. ही खरे तर एक मोठी संपत्तीच आहे. अलीकडच्या काही वर्षांत मात्र विकासाचे वारे वेगाने वाहू लागले आणि त्यामुळे कोकणभूमीतील ही विविधता धोक्यात आली की, काय अशी भीती वाटू लागली आहे.

किंबहुना अनेक ठिकाणी ही भीती प्रत्यक्षात उतरलेली दिसते आहे. वेगवेगळ्या कामांसाठी होत असलेली देवरायांची आणि वनरायांची तोड, समुद्रात सोडले जाणारे प्रदूषित पाणी, कारखान्यांच्या उत्सर्जनामुळे होत असलेले जल आणि वायू प्रदूषण यांमुळे अनेक माशांपासून पक्ष्यांपर्यंत आणि झाडाझुडपांपासून वेगवेगळ्या सजीवांची जैवविविधता धोक्यात आली आहे.

कुंडीची देवराई या देवराईत तीस फूट घेराचा भला मोठा दासवनाचा वृक्ष आहे. कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत. जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवण, कडू कवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात. तामनाळ्याच्या देवराईत राळधुपाचे वृक्ष आहेत. कुंडे, मार्लेश्वर, उजगाव, कुळे, मासरंग येथील देवरायांत पाण्याची कुंडे आहेत. विग्रवली, काटवली, कुरघुंडा, बाशी यांसारख्या देवरायांतही जुन्या विहिरी आणि कुंडेही आहेत. आसपासच्या बाकीच्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असली, तरी देवराईमधल्या जलस्रोतांना भरपूर पाणी असते आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गावाचा पाणीपुरवठा इथल्या विहिरींवरच अवलंबून असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे. दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचऱ्याजवळची देवराई तब्बल १०० एकरांवर पसरली आहे.

कोकणाचे वैभव असणारे माडगरुडासारखे पक्षी, भेकर, पिसोरी, ससे, मोर कोल्हे असे पूर्वी सर्वत्र आढळणारे वन्यजीव देवरायांच्या आश्रयाने राहत. देवराई आकाराने मोठी असल्यास सांबर, भेकर यांसारखे मोठे प्राणी खाद्यशोधार्थ भेट देत किंवा तात्पुरत्या मुक्कामासाठी येत. ज्या देवराया सह्याद्रीच्या मुख्य रांगेत आहेत तेथे वर्षभर माकडे असत. रानडुकरे, शेकरू, उदमांजर, सायाळ, असे प्राणी येथे आढळत. बहुतेक देवराया पक्षी संपन्न आहेत. देवराया पक्ष्यांची शेवटची आश्रयस्थाने आहेत. सूर्यपक्षी, बुलबुल, कुकू, धनेश, घुबडे, तांबट, कोतवाल, पोपट यांच्या विविध प्रजाती देवरायात आढळून येत, असे देवरायांच्या सर्वेक्षणात आढळले आहे. झाडा-झुडपांचे गचपण, पुरेसा आडोसा, गारवा, संरक्षण यामुळे देवराईमध्ये साप, सरडे, पाली, सापसुरळ्या, नागांचे विविध प्रकार कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीनुसार आढळून येत. बेडकांचे १०-१२ प्रकार पावसाळ्यात देवराईत आढळत. महाधनेश म्हणजेच स्थानिक भाषेत माडगरुड. सूरमाडाच्या झाडावर रसिली पिवळसर तपकिरी रंगाची फळे खाण्यासाठी हमखास हजेरी लावणारा पक्षी.

पिवळसर शिंगवाली चोच, काळे पांढरे अंग, उडताना सो सो येणारा पंखाचा आवाज यामुळे चट्टदीशी ओळखू येणारा पक्षी. उडत असताना लांबूनच पंखांच्या आवाजामुळे याचे अस्तित्व जाणवते. कोकणचे वैशिष्ट्य मानावा, असा हा विहंग. हरियल, साळुंक्या, तांबट, हळद्या, मलबारी धनेश, पोपट हे जरी आपली उपस्थिती लावत असले तरी जेव्हा एखादा माडगरुड जवळपास असेल; परंतु गेल्या काही वर्षांत मोठ्या झाडांची कमी होणारी संख्या, रानातील फळे देणारी झाडांची घटलेली संख्या आणि देवराईवर झालेले विकासाचे अतिक्रमण यामुळे महा धनेश विरळ झाले आहेत.

सूर माडाच्या झावळ्या मोठ्या प्रमाणात तोडून त्याची तस्करी केल्याची घटना वेळोवेळी उघडकीस येत आहेत. देवराईमधली भेळे, बकुळ यांसारखी जुनी मोठ्या बुंध्याची झाडे देवळाचे काँक्रिटीकरण करण्याच्या नव्या पद्धतीमुळे तोडीच्या हवाली झाली आहेत. आंबा, काजू, अननस, रबरची एकसुरी लागवड एकंदरीत जंगलांची विविधता नष्ट करतात. फळं न मिळाल्याने ग्रेट हॉर्नबिलला आता प्रचंड लांबवर फेऱ्या माराव्या लागत असणार हे नक्की. आंबोली दोडामार्गमध्ये रबर लागवडीचे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सह्याद्रीचे भूषण असणारा हा पक्षी आता नष्टप्राय प्रजातीच्या दर्जापर्यंत पोहोचला आहे. अजून वेळ गेलेली नाही. देशी झाडांची लागवड, जंगलांची तोड रोखणे, आणि असणारे जंगल पट्टे community reserve म्हणून घोषित करणे, हाच तातडीचा उपाय आता शिल्लक आहे.

याचबरोबर या पक्ष्याचे जंगल वाढीमध्ये असणारे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नाहीतर विकासाच्या हव्यासापायी ज्या मूलनिवासी पक्ष्याने ही सह्याद्रीची जंगलं वाढवली, त्यांना आकार-उकार दिला, त्यांच्या सीमा वाढवल्या त्याच पक्ष्याचे नष्टप्राय होणे हे परवडणारे नाही. या गोष्टी घडल्या, तरच या बदलणाऱ्या देशात निसर्ग होता त्या मूळच्या स्वरूपात राहू शकेल.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago