Monday, July 7, 2025

उड्डाणपुलासाठी नवी मुंबईतील ३९१ झाडांचा जाणार बळी

उड्डाणपुलासाठी नवी मुंबईतील ३९१ झाडांचा जाणार बळी

नवी मुंबई (प्रतिनिधी) : उड्डाणपुलासाठी वाशी या मध्यवर्ती भागातील ३९१ झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी तेथील मेट्रो कारशेड अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी मुंबईतील प्रस्तावित वृक्ष कत्तलीबाबत काय भूमिका घेतात, याकडे रविवारी असणाऱ्या पर्यावरणदिनी सर्वाचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, झाडांच्या कत्तलीविरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आज, रविवारी पर्यावरण दिनाचे निमित्त साधून आंदोलन करण्याचा इशारा दिला असून शिवसेनेची कोंडी करण्याची त्यांची रणनीती असल्याचे सांगण्यात येते.


३६२ कोटींचा खर्च करून उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि त्यासाठी करण्यात येणारी ३९१ झाडांची कत्तल यावरून वातावरण तापवले जात आहे. त्यामुळे आरेतील झाडांच्या संरक्षणासाठी आग्रही राहिलेले मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईतील झाडेही वाचवावीत, असी पर्यावरणवादी संस्थांची अपेक्षा आहे.


ठाण्यातील नेत्यांचा हट्ट


वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरीदरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी ३६२ कोटींच्या कामाचे कार्यादेश मेसर्स एनसीसी कंपनीस महापालिकेने दिले आहेत. महापालिकेत दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असली तरी तिचा कारभार ठाण्याहून चालत असल्याची टीका विरोधी पक्ष करीत आहेत.


गेल्या दीड ते दोन वर्षांत याच ठेकेदारास ठाणे, कल्याण डोंबिवलीत सुरू असलेल्या मोठय़ा कामांची कंत्राटे मिळाली. त्यामुळे नवी मुंबईतील उड्डाणपुलासाठी या ठेकेदारास मिळालेल्या ठेक्यावरून भाजपने शिवसेनेला थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील या वृक्षतोडीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याने शिवसेनेचे स्थानिक नेते गांगरून गेले आहेत.


स्थानिक नेते एकवटले..


झाडांच्या कत्तलीविरोधात सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसने चिपको आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, आंदोलनाचे नेतृत्व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड करणार आहेत. तर त्यानंतर याच ठिकाणी भाजपने गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ‘झाडे वाचवा, लुटारूंना परत पाठवा’ या आंदोलनाची हाक दिली आहे.


नवी मुंबई लुटण्याचा डाव शहराबाहेरील काही नेत्यांनी आखला आहे. वाशीतील झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव हा याच योजनेचा भाग आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. – गणेश नाईक, नेते, भाजप

Comments
Add Comment