नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवडलेला भारतीय वेटलिफ्टिंग संघ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण शिबिराची तयारी करण्यासाठी तसेच परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी एक महिना अगोदर यजमान बर्मिंगहॅम शहरात पोहोचणार आहे. या संघात टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानूचाही समावेश आहे. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रकुल खेळ खेळले जाणार आहेत. भारतीय लिफ्टर्स त्यांच्या व्हिसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि ते २० किंवा २१ जूनपर्यंत यूकेला पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.
भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी सांगितले की, “सरकारने प्रशिक्षण शिबिराला मान्यता दिली आहे. बुकिंग झाले आहे. आम्ही फक्त व्हिसाची वाट पाहत आहोत. लिफ्टर्स महिनाभर आधी निघून जातील. व्हिसा मिळाल्यानंतरच नेमकी तारीख ठरवली जाईल. त्यासाठी संभाव्य तारीख २० किंवा २१ जून आहे.”
दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स पदक विजेत्या चानूने आधीच तिची तयारी सुरू केली आहे आणि म्हणूनच २७ वर्षीय वेटलिफ्टरने गेल्या महिन्यात अमेरिकेत एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले; परंतु युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिनुगासह इतर लिफ्टर्स व्हिसाच्या समस्येमुळे अमेरिकेला जाऊ शकले नाहीत. राष्ट्रकुल स्तरावर भारत या खेळात महासत्ता आहे. २०१८ मध्ये, भारतीयांनी पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह एकूण नऊ पदके जिंकली.
बर्मिंगहॅमला रवाना होण्यापूर्वी, चानू हिमाचल प्रदेशातील नगरोटा बागवान येथे १४ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या खेलो इंडिया युवा, कनिष्ठ आणि वरिष्ठ राष्ट्रीय मानांकन महिला वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या प्राथमिक टप्प्यात भाग घेईल. चानू व्यतिरिक्त, विद्यमान ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन हर्षदा गरुड आणि आशियाई चॅम्पियन झिली दलाबेहडा देखील इतर वेटलिफ्टर्ससह राष्ट्रकुल क्रीडा संघात सहभागी होतील. महासंघाने अव्वल आठ लिफ्टर्ससाठी २०,००० रुपयांपासून सुरू होणारी रोख बक्षिसेही जाहीर केली आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघ
महिला : मीराबाई चानू (४९ किलो), बिंदयाराणी देवी (५५ किलो), पोपी हजारिका (५९ किलो), हरजिंदर कौर (७१ किलो), पूनम यादव (७६ किलो), उषा कुमारी (८७ किलो) आणि पूर्णिमा पांडे (८७ किलो) अधिक)
पुरुष : संकेत सागर (५५ किलो), गुरुराजा पुजारी (६१ किलो), जेरेमी लालरिनुगा (६७ किलो), अचिंता सेहुली (७३ किलो), अजय सिंग (८१ किलो), विकास ठाकूर (९६ किलो), लवप्रीत सिंग (१०९ किलो) आणि गुरदीप सिंग (१०९ किलो)