Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीआमिष ठरला महावितरणच्या अघोषित भारनियमनाचा बळी

आमिष ठरला महावितरणच्या अघोषित भारनियमनाचा बळी

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रहार

मुंबई / नागपूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये झालेल्या वादळी पावसानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगांव येथे फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या  आमिष  काळे यांच्यावर घरीच व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते; परंतु महावितरणने वीज प्रवाह बंद करण्याचा निर्णय घेतला अन् या निर्णयामुळे आमिषचा बळी गेल्याचा आरोप त्यांनी केला.

या घटनेसंदर्भात आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथील पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ऊर्जा मंत्रालयाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. वाटेल तेव्हा महावितरण विद्युतप्रवाह खंडित करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या काही महिन्यात कोळसा संकटाच्या नावावर अघोषित भारनियमाचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील मेळघाट, नंदुरबार व पालघर येथील अतिदुर्गम भागात तासंतास अंधार असतो. अघोषित भारनियमांचे संकट आता मोठ्या शहरातही जाणवू लागल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरमध्ये वादळी पावसानंतर अनेक झाडे कोसळली हे जरी खरे असले तरी प्रगत तंत्रज्ञान आज महावितरणकडे उपलब्ध आहे. राज्यात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते, त्या वेळेसही वादळी पावसाचे प्रमाण आज इतकेच होते; परंतु आम्ही कधीही वीज खंडित केली नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणला विद्युत खंडित करण्याचा निर्णय घ्यायचा होता, तर त्यांनी पूर्व सूचना देणे अपेक्षित होते. जर ही सूचना देण्यात आली असती, तर काळे कुटुंबाचा आधार असलेला  आमिषचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ही वीज खंडित करण्याचा निर्णय घेणाऱ्यांवर राज्याच्या ऊर्जा मंत्रालयानेच मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच सेवेतून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी यावेळी बावनकुळे यांनी केली.

काय आहे घटना?

कोल्हापुरातील उचगांवमध्ये फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या ३८ वर्षीय आमिष  काळे यांच्यावर घरीच व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. वीजबिल थकीत असल्याने ३० मे रोजी  आमिषच्या घरचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला होता. गेल्या दोन दिवसापासून शेजाऱ्यांकडे वीज घेऊन व्हेंटिलेटर सुरू होते. मात्र बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडीत झाला अन् व्हेंटिलेटर बंद झाल्याने आमिषचा मृत्यू झाला. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी भर पावसात रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, वरिष्ठ पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतला गेला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -