इगतपुरी (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीचे सदस्य परशराम नाठे यांच्याविरोधातील ग्रामपंचायत विवाद अर्ज फेटाळण्यात आला असून त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद कायम ठेवण्याचा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त यांनी कायम केला आहे, तर तक्रारदार शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांचे अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त यांच्या आदेशामुळे अपील अमान्य करण्यात आले.
निवडणूक लढवण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या घरपट्टीची थकबाकी असल्याने गोंदे दुमाला ग्रामपालिकेचे ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे यांना अपात्र करावे, अशी तक्रार होती. मात्र त्यांच्या राजाराम नाठे यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याने राजाराम नाठे यांची तक्रार फेटाळण्यात आली आहे. यामुळे गोंदे दुमाला ग्रामस्थांसह भजनी मंडळाने आनंदोत्सव साजरा केला. तक्रारदार राजाराम नाठे यांच्या वतीने विधिज्ञ सतीश भगत, आनंदराव जगताप यांनी काम पाहिले. नाठे हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जातात. दोन्ही ठिकाणी त्यांच्या विरोधात गेलेल्या निकालामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. परशराम नाठे यांच्यातर्फे विधिज्ञ विरेंद्र गोवर्धने, सुदर्शन तांबट, महेश लोहिते यांनी काम पाहिले.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला या मोठ्या ग्रामपंचायतीची निवडणूक २०१९ मध्ये झाली होती. यामध्ये परशराम निवृत्ती नाठे हे मताधिक्य मिळवून निवडून आले. यानंतरच्या काळात त्यांना उपसरपंच पदावर संधी मिळाली. मात्र शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांनी नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे परशराम नाठे यांच्याकडे ग्रामपंचायतीची थकबाकी असल्याने त्यांना अपात्र करावे, अशा आशयाचा दावा दाखल केला. याबाबत सर्वांगीण चौकशी आणि दोन्ही पक्षकारांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. विविध पुराव्यांचा समावेश या दाव्यात करण्यात आला. त्यानुसार नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी १७ डिसेंबर २०२१ ला आदेश पारित केला. त्यामध्ये राजाराम नाठे यांचा अर्ज अमान्य करून फेटाळण्यात आला. त्या आदेशानुसार परशराम नाठे यांचे सदस्यपद कायम ठेवण्यात आले.
मात्र राजाराम नाठे यांनी या निकालाविरोधात नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांच्याकडे अपील दाखल केले. त्या आनुषंगाने अपिलावर विविध सुनावण्या घेण्यात आल्या. परशराम नाठे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचा निष्कर्ष काढून राजाराम नाठे यांचे अपील अमान्य करण्यात आले. याबाबतचा आदेश अप्पर आयुक्त यांनी निर्गमित केला आहे, तर परशराम नाठे यांचे सदस्यपद कायम ठेवण्याचा आदेश देण्यात आला. गोंदे ग्रामस्थांसह भजनी मंडळाने निर्णयाचे स्वागत करून जल्लोष केला आहे.
माझ्या नावावर कोणतेही घर नसताना घरपट्टी थकीत असल्याचे भासवण्यात आले. मात्र सत्याचा विजय होतोच. सर्वांगीण चौकशी करून राजाराम नाठे यांचे अपील फेटाळण्यात आले. यापुढे माझा जनसेवेचा वसा कायमच सुरू राहणार आहे. – परशराम नाठे, माजी उपसरपंच गोंदे दुमाला