Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत ३ हजार ६७९ मॅनहोलवर संरक्षक जाळ्या

मुंबईत ३ हजार ६७९ मॅनहोलवर संरक्षक जाळ्या

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत महापालिकेने आतापर्यंत ३ हजार ६७९ मॅनहोलवर झाकणाखाली सुसज्ज व मजबूत अशा प्रकारची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. पावसाळ्यामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास कोणत्याही मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्वतःहून परस्पर काढू टाकू नयेत. त्यातून दुर्घटना घडू शकतात. मॅनहोलवरील झाकण नागरिकांनी काढल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध महानगरपालिका प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असा इशारा देण्यात येत आहे.

मुंबईतील पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून दर वर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. यंदाही ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करून दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. जोरदार पावसानंतर व पाण्याचा निचरा झाल्यानंतरही महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करून मॅनहोलची तपासणी केली जाते.

या नियमित उपाययोजनांसोबतच मॅनहोलच्या झाकणाखाली प्रतिबंधक स्वरूपाची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही मुंबईत टप्प्याटप्प्याने सुरू आहे. संपूर्ण मुंबईत मिळून ३ हजार ६७९ मॅनहोलवर झाकणाखाली संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात २ हजार ९४५, पूर्व उपनगरात २९३, तर पश्चिम उपनगरात ४४१ मॅनहोलवर संरक्षित जाळ्या लावल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प ) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.

मुंबई महानगरात जोरदार पावसाप्रसंगी सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असते. त्यावेळी महानगरपालिकेचे संबंधित विभागातील कर्मचारी पावसाच्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा म्हणून सदर मॅनहोल उघडतात आणि तेथे धोक्याची सूचना देणारे फलक देखील लावलेले असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -