Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमीलोकनिसर्ग सोसायटीतले ‘ऑक्सिजन गार्डन’

लोकनिसर्ग सोसायटीतले ‘ऑक्सिजन गार्डन’

महेश पांचाळ

मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. वसुंधरेचे देणे फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रबोधन करणारे शब्द नेहमीच कानावर पडतात. पण आपण कितीजण याबाबतीत सजग आहोत, याचे आत्मपरिक्षण करायला हवे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जातो; परंतु संकल्प करून दिवस-रात्र झाडांची निगा राखणे कितीजणांना शक्य होते. होय. तसा कृतीशील प्रयोग मुलुंडमधील एका सोसायटीने केला आहे. मागच्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनांच्या औचित्याने सोसायटीमधील पडीक आणि डेब्रिजचा ढिगारा असलेल्या जागेवर आज नंदनवन फुलविले आहे. ३५ गुंठ्याच्या जागेत ६८५ झाडे वर्षभरात लावण्यात आली आहेत.

मुलुंड पश्चिमेला एलबीएस रोडवरून वैशाली नगरातील लोकनिसर्ग सोसायटीत जाण्याचा योग आला. घाटीपाडा रस्त्यावरून जात असताना संजय गांधी राष्ट्रीय उदयानाची जाळीची संरक्षक भिंत दिसते. लोकनिसर्ग सोसायटीत गेल्यानंतर खेळण्यासाठी गार्डन, व्यायाम करण्यासाठी ओपन जीम दिसली; परंतु मुंबईत कुठेही पाहायला मिळणार नाही असे तयार करण्यात आलेले ऑक्सिजन गार्डन पाहून मन प्रसन्न झाले. एवढेच काय तर मुंबईचे तापमान ३९ अंश सेल्सिअस असेल, तर या ठिकाणी दोन अंश कमी झाल्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.

हे गार्डन कसे उभे राहिले, हे येथील पदाधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळाले. सोसायटीच्या भिंतीलगतच्या मोकळ्या जागेत सिंमेट, रेती, वीटाचा खच पडून मोठे डेब्रिज तयार झाले होते. ३० ते ३५ गुंठे जागेवर पसरलेल्या डेब्रिजमुळे सोसायटीमध्ये गेले २० वर्षे बकालपणा आला होता. त्यामुळे डेब्रिज बाहेर काढण्यासाठी सचिव महेश भारतीय यांनी पुढाकार घेऊन, या जागेवर वनसंपदा निर्माण करण्याचा संकल्प केला. त्याला सोसायटीचे अध्यक्ष व शेतीप्रेमी जे. पी. लगड यांनी साथ दिली. नवीन गोष्टी असल्याने काही मोजक्या मंडळींनी या संकल्पाचे स्वागत केले. सोसायटीतील सदस्यांनी श्रमदान केले. बंजारा मजूर यांच्या मदतीने गेल्या वर्षी १ ते ७ जुलै राष्ट्रीय पर्यावरण सप्ताह साजरा केला. त्याआधी २५ जूनपासून गेली वीस वर्षे ज्या जागेवर डेब्रिज फेकले जात होते. त्या जागेवर २०० पोती शेणखत टाकले गेले. तसेच याठिकाणी दीड फूट बाय एक फुटाचे खड्डे तयार करण्यात आले. त्या जमिनीचा पोत शेणखत आणि गांडूळ यांनी वाढवून ३७२ झाडे लावण्यात आली. बघता बघता आता वर्ष होत आहे; परंतु या जैवविविधता दिवसाला २१६ झाडे लावून मियावाकी पद्धतीने झाडे लावली. सुदाम थोरात, गंगाराम लोखंडे यांनी सर्व खड्डे खणले. कुमार, स्वाती भारतीय यांनी शेणखत टाकले आणि मिळेल ते काम केले आणि डेब्रीजवर नंदनवन फुलले. संस्थेचे वॅाचमन दीपक, मांडवकर, रोहित यादव यांनी वेळ काढून मदत केली, तर गार्डन ‘टी’ विभाग महापालिका कर्मचारी अधिकारी जगदीश भोईर, गणेश अंबोरे, गार्डनर ढगळे यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे सदस्य गिरिधर गावंड, मंदाकिनी गावंड, स्वाती भारतीय, अशोक लाडंगे, इलेक्ट्रिशियन जगदिश यांची सततची देखरेख कामी आली. सोसायटीने स्वत:हून पुढाकार घेतल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका ‘टी’ विभाग यांच्या गार्डन विभागाने या कामी चांगले सहकार्य केले. येथील सोनार बंगला रोपवाटीकेतील रतनगुंज, अकेशिया, फणस, स्टरकुलिया, कदम्ब, करंज, बदाम, देवधर, परकीया, स्टॅबेबुया, नीम, पाम, कैलाशपती, बेहडा, बोरी या रोपांनी ही ‘लोकनिसर्ग वनराई’ निर्माण झाली. त्याचप्रमाणे चाफा, थायलंड चाफा, रातराणी, साग, बांबू या ठिकाणी दिसतात. वनऔषधी उद्यानात सर्पगंधा, अश्वगंधा, सब्जा, पानफुटी, कापूर, तुळस, ईन्शुलिन, वाळारिठा, दमवेळ, गुळवेळ, मेंदी, मघुनाशिनी, अक्कलकारा, सफेद हळद, नीम, बदाम आदींची स्वतंत्र आयुर्वेदीक बाग १५ गुंठ्यांच्या जागेत दिसते. ख्रिसमस ट्री, फुललेला चाफा, बकुळ या ठिकाणी लक्ष वेधून घेतो. १५ गुंठ्यामध्ये मियावॉकी तंत्रज्ञानाने लावण्यात आली आहेत. वृक्षगुरू डॉ. अकीरा मियावाकी यांनी जपानमध्ये एक क्षेत्रफळाच्या जागेत एक हजार ३०० जंगले निर्माण केली. तशी कमी क्षेत्रफळाच्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयोग ऑक्सिजन गार्डनमध्ये करण्यात आल्याचे दिसून आले. “मला प्रथमपासून माझ्या पत्नीने याकामासाठी मदत केली या कामामुळे मला तीन महिने कमरेला पट्टा लावावा लागला, वैद्यकीय उपचारासाठी हजारो रूपये गेले. पण एक माणूस जन्म ते मृत्यूपर्यंत एक हजार किलो कचरा करतो. त्यापुढे मला झालेला त्रास कमी आहे. पत्नीने घरची जबाबदारी सांभाळून या वनराईतील छोट्या रोपट्यांकडे तिने लक्ष दिले. तिच्यामुळे येथपर्यंतचा प्रवास छान झाला. सर्व रोपांनी बाळसे धरले आहे,” अशी प्रतिक्रिया महेश भारतीय यांनी दिली.

लोकनिसर्ग संस्थेच्या गृहनिर्माण संकुलात दोन हजार लोकांची वस्ती आहे. पण आता चिमणी, कावळे, बुलबुल, कोकीळा, मैना, मुंगूस, साप, फुलपाखरे, खारूताई यांचेही आता हे घरच झाले आहे. सोसायटीने ६८५ झाडे लावली आहेत. मुंबईतील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये विरोधाभास असतो. नवीन गोष्टी घडत असताना निर्मितीक्षम मोजक्या व्यक्तीमुळे इतरांना आनंद देणाऱ्या गोष्टी घडू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकनिसर्ग सोसायटी. अशा गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक पाऊल उचलल्यास मुंबईचे चित्र बदलू शकते. मुंबईतील प्रत्येक सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी हे गार्डन पाहण्यास यायला हवे. आपल्या सोसायटीतील अतिरिक्त जागेचा चांगल्या कार्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे या ऑक्सिजन गार्डनला अवश्य भेट द्या. पर्यावरण दिनाचा नवा संकल्प करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -