मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून शनिवारी राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज ८८९ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्यादेखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण ५८८८ सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे ४२९४ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये ७६९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. २८ मे रोजी बीए ४ आणि बीए ५ ओमायक्रॉन सब व्हेरीयंट रुग्णांची नोंद झाल्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. २७ मे रोजी राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २ हजार ७७२ होती. तर आज ४ जून रोजी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५ हजार ८८८ वर गेली आहे.
राज्यात आज एकूण ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,37,950 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के आहे. राज्यात आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,89,212 झाली आहे.