नवी दिल्ली : एकेकाळी आघाडीचे सर्च इंजिन असणारे इंटरनेट एक्सप्लोरर कायमचा निरोप घेणार आहे. मायक्रोसॉफ्टने १५ जूनपासून इंटरनेट एक्सप्लोरर ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गूगल क्रोम, मोजिला फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट एज या सर्च इंजिन्सचा वापर वाढल्यानंतर इंटरनेट एक्सप्लोररची लोकप्रियता उतरणीला लागली. इंटरनेट एक्सप्लोरर वापरकर्त्यांच्या संख्येत सातत्याने घट होऊ लागल्यामुळे मायक्रोसॉफ्टने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. मायक्रोसॉफ्टने मागील वर्षी ही घोषणा केली. त्यानंतर आता इंटरनेट एक्सप्लोररला निरोप देण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.
आज गूगल क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी देश-विदेशातल्या अनेक बँकांमध्ये इंटरनेट एक्सप्लोररच्या वापराला प्राधान्य दिले जाते. भारतात बहुसंख्य शासकीय आणि बिगरशासकीय संस्थांमध्ये इंटरनेट एक्सप्लोररद्वारेच बरेच कामकाज चालते. काही संस्थांमध्ये गूगल क्रोम, फायरफॉक्स किंवा मायक्रोसॉफ्ट एजचा वापर सुरू झाला असला तरी तिथल्या कर्मचार्यांना अजूनही इंटरनेट एक्सप्लोरर आपलेसे वाटते. अशा लोकांसाठी इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणे अडचणीचे ठरू शकते.
मायक्रोसॉफ्टने १९९५ मध्ये विंडोज ९५ सह इंटरनेट एक्सप्लोरर सादर केले होते. काही काळानंतर मायक्रोसॉफ्टच्या या सेवेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. अर्थात इंटरनेट एक्सप्लोरर येण्याआधीही वर्ल्डवाईड वेब, आयबीएम वेब एक्सप्लोरर, मोसाइक, नेटस्केप नेव्हीगेटर आदी ब्राउजर्सचा समावेश होता. यापैकी नेटस्केप नेव्हीगेटरला बरीच लोकप्रियता मिळाली होती. मात्र इंटरनेट एक्सप्लोररचे आगमन झाल्यानंतर ही सेवा मागे पडली .मात्र त्यानंतर मोजिला फायरफॉक्स आणि गूगल क्रोम आल्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर मागे पडू लागले आणि अखेर मायक्रोसॉफ्टने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.