महाड (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावानजीक एक कार एसटी बसवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी एकाच कुटुंबातील आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यात एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
शनिवारी सायंकाळी (एमएच ०२० बीएल ३२२६) या क्रमांकाची एसटी बस मुंबईहून महाडकडे येताना केंबुर्लीनजीक रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी (एमएच ०१ बीयू ३८११) या क्रमांकाची कार चुकीच्या दिशेने जात या बसवर आदळली. या अपघातात कारचालक सचिन लिगम (वय ३८), सानिका लिगम (वय ३५), आराध्य लिगम (८), अथर्व लिगम (वय १३) आणि गुणाजी लिगम (वय ७५) हे पाच जण जखमी झाले. यापैकी सानिका आणि आराध्य हे गंभीर असून त्यांना मुबई येथे हलविण्यात आले आहे. लिगम कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्यातील हसोळ येथे रहिवासी असून ते मुंबईत वास्तव्याला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलींद खोपडे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक मोकळी केली.