मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाच्या केसेसमध्ये होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही आदेश जारी केले आहेत. तर दुसरीकडे बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असे टास्क फोर्सच्या बैठकीत ठरले आहे. तो आवाहनाचा मुद्दा आहे, त्यात मास्कसक्ती नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. यामुळे नक्की कोणती भूमिका घ्यावी, मंत्र्यांचे ऐकायचे की वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करायचे या द्विधा मनस्थितीत आरोग्य खात्याचे कर्मचारी गोंधळून गेले आहेत.
आपल्याकडे मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये थोड्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाकडून पत्रक आले आहे. या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागतील. त्याबाबतीत टास्क फोर्सची एक बैठक झाली. यात बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असे ठरवण्यात आले. तो आवाहनाचा मुद्दा आहे, त्यात मास्कसक्ती नाही,” असे स्पष्टीकरण टोपे यांनी दिले आहे.
तर आरोग्य प्रशासनातर्फे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून या ठिकाणी टेस्टिंग, लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला दिला आहे. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवून वरील सूचना दिल्यानंतर व्यास यांनी स्थानिक आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
‘रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक असल्याचे व्यास यांनी राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिका-यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. १ जूनच्या आकडेवारीनुसार, २६ जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचे प्रमाण तत्काळ वाढवावे’, असे पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार का? याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.