बुद्धिमान अशा अवघ्या मानव जातीला वेठीस धरून ‘सळो की पळो’ करून सोडणारा आणि तब्बल दोन वर्षे जगभरात थैमान घालणारा महाभीषण असा कोरोना विषाणू पुन्हा एकदा आपले हात-पाय पसरू लागला आहे. कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्यानंतर सरकारकडून अलीकडेच निर्बंध उठविण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. मात्र आता सर्वजण बेसावध असताना पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशभरासह महाराष्ट्रातही कोरोनाचे सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
विशेष गंभीर बाब म्हणजे मार्च महिन्यानंतर देशात झालेली ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. देशात ११ मार्चनंतरची ही कोरोना रुग्णांची मोठी नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे. आदल्या दिवशी देशात ३७१२ नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा चार हजारांच्या वर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही आता २० हजारांच्या वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढीचा दर ०.०५ टक्के आहे, तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७४ टक्के आहे. दिवसभरात २ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४ लाख २५ हजार ३७९ नमुने तपासण्यात आले आहेत, तर देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत १९३ कोटींहून अधिक जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत आणि हा एक विक्रमच आहे.
असे असले तरी या जीवघेण्या कोरोनाने देशभरात आतापर्यंत ५ लाख २४ हजार ६५१ जणांचा बळी घेतला आहे. ही अाकडेवारी पाहिली तरी नजरेस न पडणाऱ्या या विषाणूची दाहकता किती आहे? हे कुणाच्याही लक्षात येईल. असे असले तरी देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून ४ कोटी २६ लाख २२ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत. आपल्यासाठी अधिक चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत व त्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १०४५ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल राजधानी दिल्लीमध्ये ३७३, तामिळनाडू १४५, तेलंगणात ६७, गुजरातमध्ये ५०, तर मध्य प्रदेशमध्ये २५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशपातळीवर कोरोना रुग्णवाढ कायम आहे. एका दिवसाआधी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या २४ तासांत २७४५ नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राजधानी दिल्लीतही हा विषाणू हातपाय पसरत चालला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर प्रियंका गांधी यांनीही आपला लखनऊ दौरा अर्धवट सोडत दिल्ली गाठली. प्रियंका गांधी-वाड्रा यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. देशपातळीवर कोरोना रुग्णवाढ कायम आहे. एका दिवसाआधी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या २४ तासांत २७४५ नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजमितीस एकूण ४५५९ सक्रिय रुग्ण आढळले असून, मुंबईत सर्वाधिक म्हणजे ३३२४ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक असून, ठाण्यामध्ये ५५५ इतके सक्रिय रुग्ण आढळले आहेत. पुण्यातही ३७२ सक्रिय रुग्ण आहेत. रायगड १०६, पालघर ५८ सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या १० पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण ४५५९ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. म्हणजेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णवाढ होत आहे, ही बाब सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग अधिक आहे.
हा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनच्या वंशावळीतीलच असला तरी तो गंभीर स्वरूप धारण करणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र आधीच अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या धोक्यापासून स्वत:चा आणि कुटुंबीयांचा तसेच आसपासच्या लोकांचा बचाव करायचा असेल, तर पुन्हा एकदा चेहऱ्यावर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे.
या नव्या संसर्गाचा वेग पाहता त्याला अटकाव करायचा असेल, तर गर्दी टाळायला हवी किंवा गर्दीच्या ठिकाणांमध्ये सर्वांनी मास्कचा वापर करायला हवा. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब ध्यानी घेऊन राज्य शासन पुढील पंधरा दिवस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आढावा घेणार आहे व नंतरच निर्बंध लादण्याबाबतचे निर्णय घेतले जातील असे दिसते. या सर्व हालचाली ध्यानी घेऊन जर पुन्हा निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळणे ही काळाची गरज आहे.