कारभार शिकाऊ महिला डॉक्टरच्या हवाली
सफाळे (वार्ताहर) : सतत विविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची लापरवाही पुन्हा एकदा समोर आली आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त कपासे भागातील माहेर रिसॉर्टमधील खानपानासाठी हजेरी लावण्यासाठी एका शिकाऊ महिला डॉक्टरच्या ताब्यात आरोग्य केंद्र सोपवून येथील डॉक्टरांनी आपल्या बेजबाबदार कारभाराचे दर्शन घडवून दिले आहे.
पालघर तालुक्यातील सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ३० ते ३५ गावपाडे समाविष्ट असून, दररोज सुमारे शंभराहून अधिक रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येथे येतात. मात्र दैनंदिन वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. परिसरात रस्ते अपघातांची संख्या जास्त असून हृदयरोग, उच्च रक्तदाब, श्वानदंश, सर्पदंश, आदी गंभीर प्रकार घडतच असतात. आधीच या सर्व प्रकारात वेळीच व योग्य उपचार आरोग्य केंद्रातून मिळत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी येथील नागरिक करीत असून यासाठी आंदोलने देखील झाली आहेत.
अशातच आता आरोग्य केंद्रातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद रणदिवे यांचा शुक्रवार ३ जून रोजी सेवापूर्ती सोहळा कपासे भागातील माहेर रिसॉर्टमध्ये फक्त काही मर्जीतल्या लोकांना घेऊन आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज विश्वकर्मा यांनी एका शिकाऊ महिला डॉक्टरच्या ताब्यात आरोग्य केंद्र सोपवून तेथे धाव घेतली. यासंदर्भात, स्थानिक पत्रकारांनी रुग्णालयात जाऊन पाहणी करून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांना आरोग्य केंद्रात जबाबदार डॉक्टर नसल्याचे फोन करून निदर्शनास आणून दिले.
त्यावर सिरिअस पेशंट असेल, तर डॉक्टरांना आरोग्य केंद्रात पाठवतो असे उत्तर त्यांनी दिले. एकंदरीतच या सर्व परिस्थितीतून सफाळे परिसरातील नागरिक आजही आरोग्याच्या दृष्टीने चिंतेत असून अशा बेजबाबदार डॉक्टरांवर जिल्हा आरोग्य यंत्रणा कारवाई करेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.