Friday, July 12, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरअर्नाळा ग्रामपंचायतविरोधात कोळी महिलांचे लाक्षणिक उपोषण

अर्नाळा ग्रामपंचायतविरोधात कोळी महिलांचे लाक्षणिक उपोषण

शितपेटी वाटपाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

विरार (वार्तहर) : पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लाभार्थी कोळी मच्छी विक्रेता महिलांना अर्नाळा ग्रामपंचायत मागील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील फंडातून शितपेट्या वाटप करणार होती. शितपेट्या मिळाव्यात यासाठी अर्नाळा गावातील मच्छी विक्रेत्या महिलांनी तसेच कोळी महिला मच्छी विक्रेता सोसायटी यांच्यामार्फत वेळोवेळी विनवण्या आणि पाठपुरावा केला होता.

तरीदेखील अजून अर्नाळा ग्रामपंचायतीने कोळी महिलांना शितपेट्या वाटप न केल्याचा विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला असल्याचे किरण निजाई यांनी सांगितले. अर्नाळा गावांतील मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना शितपेट्या वाटप केल्या नाहीत, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्याचा इशारा किरण नीजाई यांनी पत्राद्वारे दिला होता. ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळपासून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मोठ्या संख्येने कोळी महिलांनी किरण नीजाई यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ठिय्या ठोकला.

यावेळी घोषणाबाजी आणि पारंपरिक गीते गाऊन सत्ताधाऱ्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी सुट्टीवर होते, तर सरपंच हेमलता बाळशी व उपसरपंच महेंद्र पाटील कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. अखेर उपसरपंच महेंद्र पाटील यांनी वरिष्ठ लिपिक किशोर कुडू यांच्यामार्फत येत्या आठवडा भरात शितपेट्या वाटप करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना देऊन त्यांना लिंबूपाणी पाजण्यात आले. त्यानंतर किरण निकाई यांनी अनोलान तूर्तास स्थगित केल्याची सांगितले.

मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी शासन निर्णय होऊन १५वा वित्त आयोगातून शितपेटीसाठी निधी मंजूर झाला असतानासुद्धा अर्नाळा ग्रामपंचायत शितपेट्या वाटप करायला तयार नाही. सत्ताधारी मच्छी विक्रेता कोळी महिलांची दिशाभूल करून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असेल, तर हे योग्य नाही. येथील जनतेने एकहाती सत्ता दिली. योजनांचा लाभ मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, असे किरण निजई म्हणाले. अर्नाळा ग्रामपंचायतीचे उपसपंच महेंद्र पाटील म्हणाले, आम्ही चर्चेसाठी त्यांना पत्र देऊन बोलावले होते; परंतु ते आले नाहीत.

त्यांना आंदोलन करण्यातच स्वारस्य वाटते. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देणेकामी पाच वर्षांचा आराखडा तयार होताच. त्यामध्ये मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना शितपेट्या वाटपाबाबत समावेश केला आहे. मासिक सभेत तसा ठराव होऊन निर्णय झाला असून कार्यवाही सुरू आहे. लवकरच शितपेट्यांचे वाटप करण्यात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -