कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारच वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांचे पगार देत नाही. अनुदान आणि कसलाच निधी नगर वाचनालयांना देत नाही. जे लोक कणकवली नगर वाचनालयावर बोलतात, त्यांनी स्वतःच्या पक्षाचे नेते या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडून वाचनालयाचे अनुदान आणावे. मी स्वखर्चातून वाचनालय पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहेच, ती पूर्ण करणारच. मात्र तुम्ही इकडे-तिकडे इनोवा आणि फॉर्च्युनर गाड्या मागण्यापेक्षा चांगल्या कामाला हातभार लावा.
तुमच्या ठाकरे सरकारकडून नगर वाचनालयाला निधी आणून दाखवा, असे आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले. ठाकरे सरकारने नगर वाचनालयांना अनुदान दिले नाही. या नगर वाचनालयाची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या खात्याअंतर्गत येते. नगर वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून मी अनेक वेळा या खात्याकडे पत्रव्यवहार केला आहे. तरी निधी दिला जात नाही.
अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. तुटपुंज्या पगारावर कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. अशाही परिस्थितीत कणकवली नगर वाचनालय आम्ही चालवत आहोत. त्यात मी स्वखर्चाने वाचनालयाच्या इमारतीचे काम करत आहे. त्यात नगर वाचनालयाच्या सिव्हिलचे काम पूर्ण झाले आहे. इंटिरियरचे काम सुरू आहे. मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव असल्याने काम धीम्या गतीने झाले. मात्र येत्या काही दिवसांतच ते पूर्ण होईल. जे लोक टीका करतात त्यांनी स्वखर्चाने हातभार द्यावा, असे आव्हान नितेश राणे यांनी विरोधकांना दिले.