मुंबई : सीएनजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, त्याशिवाय महागाईतही वाढ झाल्याने टॅक्सी संघटनांनी प्रवास भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत पुढील आठवड्यात रिक्षा, टॅक्सी संघटना आणि परिवहन विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीत दरवाढी बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
कोरोना लॉकडाउन शिथील करण्यात आल्यानंतर दरवाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी रिक्षा, टॅक्सी संघटनांनी आग्रही मागणी केली नव्हती. तरीदेखील ही दरवाढ झाली होती. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर ८० रुपयांच्या घरात पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत आहे. त्याशिवाय वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक गणित जमवणे रिक्षा-टॅक्सी चालकांना कठीण होत आहे.
टॅक्सी चालक संघटनेने राज्य परिवहन विभागाकडे पाच रुपये दरवाढीची मागणी केली आहे. सध्या टॅक्सीच्या प्रवास भाड्याचा पहिला टप्पा २५ रुपये आहे. हा टप्पा ३० रुपये करण्याची मागणी टॅक्सी चालक संघटनांनी केली आहे. तर, परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दराच्या टप्प्यात चार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षाच्या दरातही तीन ते चार रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता आहे. सध्या रिक्षा प्रवासाच्या पहिल्या टप्प्यासाठी २१ रुपये मोजावे लागतात.
रिक्षा आणि टॅक्सी भाडे वाढवण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी माहिती दिली होती. आरटीओमधील सहा सुविधा फेसलेस करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना दरवाढी बाबत विचार सुरू असल्याचे म्हटले होते.