Saturday, June 29, 2024
Homeमहत्वाची बातमीआता बिल्डरच्याच कार्यालयातून करता येणार मालमत्तेची नोंदणी

आता बिल्डरच्याच कार्यालयातून करता येणार मालमत्तेची नोंदणी

नाशिक मध्ये ई–रजिस्ट्रेशन होणार सुरु

नाशिक (प्रतिनिधी) : नवीन मालमत्ता विकत घेतल्यानंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. ही नोंदणी ग्राहकांना आता बिल्डरच्याच कार्यालयात करता येणार असल्याचे प्रतिपादन क्रेङाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले. अशी सेवा मिळणारे नाशिक हे राज्यातील तिसरे शहर ठरले असून याआधी मुंबई व पुण्यामध्ये ही सेवा ग्राहकांना मिळत आहे.

नोंदणी प्रक्रियेमध्ये निरंतर सुधारणा होत असून २००२ च्या आधी ही प्रक्रिया पूर्णपणे मॅन्युअल होती. त्यानंतर या प्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले. आज सुरू करण्यात आलेली ई-रजिस्ट्रेशन सेवा या नोदणी प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा ठरणार असून यामुळे ग्राहकांना नोंदणीसाठी ताटकळत राहण्याची गरज राहणार नाही, असेही महाजन यांनी सांगितले. दिवसेंदिवस शहरे विस्तारित होत असून नवनवीन प्रकल्पात नोंदणी करण्यासाठी वाढीव इन्फ्रास्ट्रक्चरची गरज यामुळे पूर्ण होणार आहे. आता ग्राहकांना कोणत्याही दिवशी म्हणजे अगदी सुट्टीच्या दिवशी देखील कोणत्याही वेळी नोंदणी करणे शक्य होणार आहे.

ही सेवा देण्यासाठी ज्याच्या प्रकल्पामध्ये ५० हून अधिक युनिट (फ्लॅट, प्लॉट, दुकान, ऑफिसेस) आहेत, अशा बांधकाम व्यावसायिकाने या सेवेसाठी राज्य शासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत प्रकल्पातील ग्राहकांना हा लाभ घेता येईल, असेही त्यांनी नमूद केले. या सेवेच्या प्रशिक्षणासाठी आज नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे आणि सहजिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक तसेच क्रेडाई नाशिक मेट्रोच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुण्याचे श्रवण हार्डीकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित या कार्यशाळेत बोलतांना मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे म्हणाले की, महाराष्ट्र शासनातर्फे ई–रजिस्ट्रेशन सुविधा नाशिकमध्ये सुरु झाली असून यामुळे बांधकाम व्यावसायिक मालमत्तेची विक्री पश्चात नोंदणी त्याच्याच कार्यालयात करू शकतो.

या सुविधेचा लाभ ग्राहकांना होणार आहे. तसेच यामुळे व्यवहारात अधिक पारदर्शकता येऊन गैरव्यवहार देखील टाळता येणे शक्य होणार आहे. ही सुविधा सुलभ प्रकारे राबविण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच लाभदायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -