मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली असून सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी राज्यात एक हजार १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज ७६३ कोरोना रुग्ण आढळले. तर ठाणे मनपा ७७, नवी मुंबई ७१, पुणे मनपा ७२ नवीन कोरोना रुग्ण आढळले.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पाच हजार १२७ इतकी झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरीयंटचे बीए४ आणि बीए५ सब-व्हेरीयंटचा वेगाने प्रसार होत असल्याचे तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवले आहे.
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या ३७३५ सक्रीय रुग्ण आहेत. राज्याच्या ६० टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तर ठाणे ६५८, रायगड १०८ आणि पुण्यात ४०९ सक्रीय रुग्ण आहेत.