Sunday, August 24, 2025

दापचरीत अनधिकृत बांधकामावर हातोडा

दापचरीत अनधिकृत बांधकामावर हातोडा

कासा (वातार्हर) : डहाणू तालुक्यातील दापचरी बोर्डाच्या समोर असलेल्या जागेत कृषी विभागाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती फळ वाटिकेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर लावून धडक कारवाई केली. कारवाई केल्यानंतर ती जागा कृषी विभागाच्या कार्यालयाच्या ताब्यात दिली.

दापचरी दुग्ध प्रकल्पातील चिकित्सलयाच्या इमारतीवर इंडो इस्माईल ऍग्रो इंडस्ट्रीज मुंबई यांनी अतिक्रमण केले होते येथे अतिक्रमण केलेल्या जागेत अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड उभारून तेथे शैक्षणिक संस्था उभारली होती. ही जागा कृषी विभागाच्या ताब्यात होती. त्यांनी तीन वर्षासाठी इंडो इस्राईल ॲग्रो इंडस्ट्रिज मुंबई यांना भाडे तत्त्वावर दिली होती. कृषी विभागाने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी पत्रव्यवहार केला. पण ती संस्था दाद देत नव्हती.

शेवटी हा वाद न्यायालयात गेला. तिथे त्यांचा दावा फेटाळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा कृषी अधिकारी दिलीप नेरकर, डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख, कृषी अधिकारी संतोष पवार, बांधकाम विभाग अधिकारी, कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलीस विभाग अधिकारी यांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.

कारवाई केल्यानंतर लगेचच या जागेत कृषी विभागाचे क्षेत्रीय कार्यालय मंडल कृषी अधिकारी कासाअंतर्गत कृषी सहाय्यक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचेसुद्धा उद्घाटन करण्यात आले. इंडो इस्माईल एग्रो इंद्रस्टीज कडून आम्हास फक्त २४ तास अगोदर साधे पत्र दिले होते. आगाऊ माहिती दिली असती, तर आम्ही आमचे सगळे सामान वाचवू शकलो असतो.

Comments
Add Comment