Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीपराभवाचेही सोने केले; पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावर वक्तव्य

पराभवाचेही सोने केले; पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावर वक्तव्य

गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन

बीड (वृत्तसंस्था) : माझी चिंता करू नका. मला सगळे विचारतात तुमचे भविष्य काय आहे. उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचे देखील मला सोने करता आले, हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळानंतर दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थकांनी गोपीनाथ गडावर उपस्थिती दर्शवली.

आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळणार याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे आहे ते कसे आपल्याला बांधून ठेवता येईल, हे आपल्याला करायचे आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.दरम्यान सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे हे सत्यासाठी लढले, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडले. निर्भीड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा, अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. असेही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसे ते कळणार देखील नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -