मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाने राज्यसभा निवडणूक बिनविरोध केली जाईल, त्या बदल्यात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी ऑफर महाविकास आघाडीने दिली आहे. त्याच संदर्भात आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “काल महाविकास आघाडीच्या नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा निरोप आला. तीन पक्षाचे ज्येष्ठ नेते आले होते. राज्यसभेची निवडणूक १० तारखेला होणार आहे. आजवर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. राज्यसभेत भाजपला ३ जागा मिळाव्यात, विधान परिषदेसाठी काही विचार करता येईल. त्यांनी आम्हाला सांगितले की विधान परिषदेच्या ५ जागा देऊ, पण आम्हाला राज्यसभा जास्त महत्वाची आहे. आम्हाला ११ ते १२ मते कमी पडत आहेत. त्यांच्याकडे असलेली संख्या आमच्या ३० च्या पुढे जात नाही.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “आम्ही तिसरी जागा लढणे आणि जिंकणे यावर ठाम आहोत. त्यांनी जर आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार. आज खूप चांगली चर्चा झाली पण आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. पार्टीचा उमेदवार मागे घेणे हे शक्य नाही. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातले आहे. ते म्हणाले तुमची भूमिका योग्य आहे. त्यांनी जर त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर आम्ही लढू. जर त्यांनी आता सहकार्य केले तर आम्ही विधान परिषदेत करू.”