
मुंबई : विक्रमवीर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, संपूर्ण हंगामात अर्जून तेंडुलकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर अर्जून तेंडुलकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान का मिळाले नाही? यावर अनेक दिग्गजांनी आपले मत मांडले होते. मात्र, मुंबई इडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने यामागचे खरे कारण सांगितले आहे.
आयपीएल २०२१ मध्ये अर्जूनला २० तर २०२२ ला ३० लाख रुपयांमध्ये करारबद्ध करण्यात आले होते. २०२१ च्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडण्यापूर्वी एकही सामना खेळू शकला नाही. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय खराब झाली. सुरूवातीचे सलग सात ते आठ सामने हरल्यानंतर मुंबईने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. पण अर्जुनचा यात विचार करण्यात आला नाही. त्यावरून मुंबई इंडियन्सवर खूप टीका झाली. पण आता याच मुद्द्यावर एक नवी बाब समोर आली आहे.
प्रशिक्षक शेन बॉन्डने मांडले मत
शेन बॉन्ड म्हणाले की, ‘अर्जुन तेंडुलकर फलंदाज आणि गोलंदाज म्हणून चांगला खेळाडू आहे. त्यांना त्यांच्या कौशल्यात आणखी सुधारणा करावी लागेल. संघात सामील होणे ही वेगळी बाब आहे. परंतु, मुंबई इंडियन्ससारख्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागेल. अर्जुन तेंडुलकरचे फलंदाजी आणि गोलंदाजीचे कौशल्य चांगले होईल, तेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.’ अर्जुनला त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर काम करावे लागेल आणि आशा आहे की तो त्यांच्यावर काम करेल आणि लवकरच संघात आपले स्थान बनवेल."