मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी ३१ मे रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले. याचदरम्यान ते पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मास्क घालणं महत्वाचं का आहे, याबद्दल भाष्य करताना अप्रत्यक्षपणे राज यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचा उल्लेख केला.
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी आता तुम्ही बघा काही काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला, ऑपरेशन करायला गेले आणि कोरोना झाला. आता गेले ना दिवस वाया, गेले की नाही? असे होवू नये. प्रत्येकाचा एक एक दिवस, एक एक मिनीट, एक एक तास, एक एक सेकंद महत्वाचा असतो. त्यामुळेच ज्यांना कुणाला वापरता येईल त्यांनी वापरावे मास्क,” असे अजित पवार यांनी म्हटले.
“मी आणि मुख्यमंत्री जेवढं मास्क वापरणे शक्य आहे तेवढे वापरण्याचा प्रयत्न करतो. कारण उद्या आम्ही सांगत असताना आपणच नाही वापरलं तर लोक, म्हणतील ए शहाण्या तूच वापरत नाही आम्हाला काय सांगतो. त्यामुळे कोणी आम्हाला सांगू पण नये की तुम्ही आधी वापरा आणि मग सांगा, म्हणून आम्ही मास्क वापरतो,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.