मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तूर्तास मास्क सक्ती करण्यात आली नसली तरी गर्दीच्या ठिकाणी जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागला असून कोरोनाच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गुरुवारी टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील १५ दिवस हे कोरोनाबाबत महत्वाचे असणार आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा पंधरा दिवस अभ्यास केला जाईल. पुढच्या १५ दिवसांनंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जातील. मास्क सक्ती नाही, परंतु घरातून बाहेर पडताना मास्क लावावा, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने टास्क फोर्ससोबत बैठक बोलावण्यात येऊन या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर आढावा घेण्यात आला. तसेच रुग्णवाढ रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना अंमलबजावणीचे निर्देश मपख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. आज राज्यात 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यात आज 4559 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3324 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाण्यामध्ये 555 सक्रिय रुग्ण आहेत.