Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीलवकरच राज्यात मास्कसक्ती?

लवकरच राज्यात मास्कसक्ती?

मुंबई : महाराष्ट्रामधील कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू केले जाणार का? यासंदर्भात दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरु झाली आहे. याचसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा पुन्हा निर्णय घेतला जाईल का, असे विचारण्यात आले असता अजित पवार यांनी जर तरच्या भाषेत या प्रश्नाला उत्तर दिले.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. “मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉक्टर व्यास सर्व माहिती देतात. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यांमध्ये काय चाललंय, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललंय हे आम्हाला ते सांगतात. या सर्व माहितीमधून सध्या एक पहायला मिळालं की कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढतेय. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी लोक आहेत,” असे अजित पवार यांनी सांगितले.

“डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा घेतला पाहिजे,” असेही अजित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे, “आमची त्यावर नजर आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु,” असे अजित पवार म्हणाले.

पत्रकार परिषद संपण्याच्या आधी एका मराठी महिला पत्रकाराने मास्क बंधनकारक करण्यावरुन पुन्हा अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांनी काही राजकारण्यांनी मास्क न घातल्याने पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा उल्लेख केला.

मास्क बंधनकारक करण्याचा विचार केला जातोय का? असे विचारले असता अजित पवार यांनी, “विचार करावाच लागेल. तुम्हाला कोरोना झाला तर आम्हाला कोण प्रश्न विचारणार,” असे उत्तर दिले असता सर्व पत्रकार हसू लागले. पुढे बोलताना अजित पवार यांनी, “सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आता तुम्ही बघा काही काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला,” असे म्हटले. अजित पवार यांच्या वक्तव्याचा रोख राज ठाकरेंच्या दिशेने होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -