नवी मुंबई : शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्वसामान्य, गरजू व आर्थिक दुर्बल नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यामुळे आर्थिक फायदा होत असतो. शासकीय योजनांच्या लाभासाठी अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिक उत्पन्न दाखला काढण्यासाठी प्रशासनदरबारी हेलपाटे मारत असतात. परंतु उत्पन्न दाखला काढण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असतानाही आजच्या काळात या प्रक्रियेतील त्रुटीचा गैरफायदा घेतला जात आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले घटक कागदोपत्री कमी उत्पन्न दाखवून शासकीय योजनांचा व शिष्यवृत्त्यांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढत आहेत.
यामुळे आर्थिकदृष्टया अत्यल्प उत्पन्न गटातील गरजू व गरीबांना शासकीय व आरोग्य सोयीसुविधांचा फायदा घेताना मर्यादा पडत आहेत. अधिकत्तम उत्पन्न असतानाही कमी उत्पन्न दाखवून उत्पन्नाचा दाखला काढण्याच्या गैरप्रकाराला आळा बसून पात्र लोकांनाच उत्पन्न दाखला देण्यात यावा अशी मागणी अत्यल्प उत्पन्न गटातील संबंधितांकडून करण्यात येत आहे.
एखाद्या कुटुंबाचे चार लाखाच्या आत उत्पन्न असेल, आरोग्य सुविधा कमी पैशात मिळत असतात. नवी मुंबईत रहिवाशी असलेल्या नागरिकांना तर मनपाचा करार असलेल्या एका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आरोग्य सुविधा विनामूल्य मिळत असतात. तसेच शिक्षण घेताना देखील आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल तर उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळतो. इतके महत्त्व या उत्पन्न दाखल्याला आहे. परंतु नवी मुंबईत उत्पन्न दाखल्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबविताना शासनाने निर्गमित केलेल्या नियमानुसार कार्यवाही होत नसल्याने नियमात बसत नसलेल्या घटकांनाही उत्पन्नाचा दाखला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
उत्पन्न दाखला काढताना एक पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार तलाठ्याकडे अर्ज सादर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर तलाठी ज्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या घरी जाऊन पाहणी करत असतो. त्यानंतर त्यांनी जे पुरावे सादर केले आहेत, त्या पुराव्याचा पंचनामा केला जातो. पंचनामा करताना तलाठ्याच्या नजरेत आर्थिक स्थिती जी आली आहे. त्यानुसार तलाठी अर्ज सादर करत आर्थिक स्थिती नमूद करत असतो. त्यानंतर संबंधितांना उत्पन्नाचा दाखला मिळत असतो.
आज एखाद्या नागरिकाला उत्पन्नाचा दाखला हवा असेल तर अर्ज घेण्यासाठी तो नागरिक महा ई सेवा केंद्रात जातो. तिथे गेल्यानंतर महा ई सेवा केंद्राचा घटक उत्पन्न दाखल्याचा अर्ज आपल्याकडेच द्यायला सांगत असतो. त्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक महा ई सेवा केंद्रात अर्ज सादर करत आपले पुरावे अर्जाला जोडतो. तलांठ्याचा पंचनामा अत्यावश्यक असतानाही संबंधित पंचनामा महा ई सेवा केंद्र चालक मागत नाही. त्यानंतर महा ई सेवा केंद्र चालक तलठ्याशी संपर्क साधत पंचनामा करून घेतो. यामुळे पंचनामा करताना खरे किती व खोटे किती याचा अंदाज लागत नाही. परंतु महा ई सेवा केंद्र चालक सबंधिताकडून दामदुप्पट गोळा करत असतो व उत्पन्न दाखला मिळवून देत असल्याच्या घटना नियमित घडत आहेत.
जलदगतीने उत्पन्न दाखला हवा असेल तर..
नवी मुंबई मधील एखाद्या नागरिक अचानक आजारी पडला व त्याला पालिकेचे करार असलेल्या वाशीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करायचे असेल तर त्याला उत्पन्न दाखल्याची गरज भासते. त्यावेळी तर दोन दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळतो. पण या मोबदल्यात संबंधितांकडून महा ई सेवा केंद्र चालकांना मागेल तो आर्थिक मोबदला मिळत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. तसेच शिक्षण, कर्ज काढण्यासाठी अशाच प्रकारे जलदगतीने मार्गाचा अवलंब केला जात आहे.
शासनाने आदेश काढल्याप्रमाणे उत्पन्न दाखल्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. हा प्रकार होत नसेल तर सर्वच प्रशासकीय घटकांना नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यास सांगितले जाईल. -युवराज बांगर, तहसीलदार, ठाणे.