काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आज कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. यापूर्वी कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती.
खोऱ्यातील हिंदू नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. अलीकडेच, बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट आणि कुलगाममध्ये महिला शिक्षिकेच्या हत्येविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. सर्व स्थलांतरित सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी तैनात करावे, अशी काश्मिरी पंडितांची मागणी होती.
दहशतवादी घटना पाहता बुधवारी, पंतप्रधानांच्या विशेष पॅकेज अंतर्गत जम्मू प्रशासनाने काश्मीरमध्ये तैनात असलेल्या स्थलांतरितांना आणि जम्मू विभागातील इतर कर्मचाऱ्यांना ६ जूनपर्यंत खोऱ्यातील सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेशही जारी केले होते.
याआधीही झालेत खोऱ्यात दहशतवाद्यांचे भ्याड हल्ले
- ३१ मे – कुलगाममधील गोपालपोरा येथे हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या.
- २५ मे – काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.
- २४ मे – पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या. सात वर्षांची मुलगी जखमी.
- १७ मे – बारामुल्ला येथील वाईन शॉपवर ग्रेनेड हल्ला. हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू. या अपघातात तीन जण जखमी झाले होते.
- १२ मे – बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची कार्यालयात घुसून गोळ्या झाडून हत्या.
- १२ मे – पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या.
- ९ मे – शोपियानमध्ये गोळीबारात एक नागरिक ठार, तर एका जवानासह दोघे जखमी.
- २ मार्च – कुलगाममधील संदू येथे पंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या.