मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरली होती. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करत केवळ एका वर्षाच्या आत याचा निकाल लावण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीने चालविण्यात येईल, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केले होते.
३४६ पानांच्या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या २५ दिवस आधीही आरोपीने महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमाने तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केले. यात लोखंडी सळीचाही त्याने वापर केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हे कृत्य पूर्वनियोजित नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी हा तपास तातडीने पूर्ण केला. या आरोपपत्रात एकूण ३७ जणांचे जबाब नोंदवले असून अॅट्रॉसिटी, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करुन तपास पूर्ण करण्यात आल्याचे पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याच आधारावर आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवत असल्याचे सोमवारी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले होते. काल (१ जून) मोहनच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला. आज शिक्षा ठोठावण्यात आली.
गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात १० सप्टेंबर २०२१ च्या मध्यरात्री एक ३२ वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही ११ सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर काही तासांच्या आतच मुंबई पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक केली होती. मोहनवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बलात्कार, हत्या, अॅट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर अवघ्या १८ दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.