नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सत्येंद्र जैन यांना अरविंद केजरीवाल वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत? सत्येंद्र जैन यांनी ४ शेल कंपनीच्या कुटुंबाच्या मदतीने आणि हवाला ऑपरेटरच्या मदतीने २०१० ते २०१६ या काळात मनी लाँड्रिंग केल्याचे अरविंद केजरीवाल नाकारू शकतात का? असे सवाल स्मृती इराणी यांनी केले आहेत. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्मृती इराणी बोलत होत्या.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर ते मंत्रीपदावर कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करत स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक प्रश्न विचारले. तसेच, सत्येंद्र जैन यांना केजरीवाल का वाचवत आहेत? असा सवाल स्मृती इराणी यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, उद्योग, ऊर्जा, गृह, शहरी विकास आणि पाणी मंत्री आहेत. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून सोमवारी अटक करण्यात आली. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीने ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, भ्रष्टाचार म्हणजे देशाशी विश्वासघात, मग देशाच्या गद्दारांना आश्रय दिला जात आहे का? न्यायालयाने सत्येंद्र जैन यांची भूमिका जाहीर केल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही का? आजवर सत्येंद्र जैन यांच्याकडे काळा पैसा असल्याचे अरविंद केजरीवाल यांना माहीत होते, तरीही अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? सत्येंद्र जैन यांचा घोटाळा ही अरविंद केजरीवालांची मजबुरी आहे का? दिल्ली उच्च न्यायालय हा राजकीय पक्ष आहे का?, असे सवाल करत स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.