कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीने मुंबई-गोवा मार्गावर टोलविरोधी केलेल्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यातच फार मोठे यश आले आहे. कणकवली ओसरगाव येथे बुधवारी १ जूनपासून सुरू होणारी टोलवसुली तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, टोल कंपनीचे अधिकारी, महसूल प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त तसेच टोलविरोधी तक्रार असणाऱ्या सर्व घटकांना एकत्र घेऊन याविषयी बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर योग्य ती प्रक्रिया केली जाईल. तोपर्यंत बुधवारपासून सुरू होणारी टोलवसुली थांबवण्यात आली असल्याची माहिती कणकवलीच्या प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रक, टेम्पोचालक-मालकांनी ओसरगाव टोल नाक्याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणावर ओसरगाव येथे असलेल्या टोल नाक्यावर १ जूनपासून टोल सुरू केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली होती. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी प्रांताधिकाऱ्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटले व १ जूनपासून टोलवसुली केल्यास गंभीर परिणाम होतील, त्यापूर्वी प्रशासन अधिकारी व सर्वांची एकत्रित मीटिंग घ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी द्या, बैठक झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी मागणी केली होती.
या मागणीनुसार, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून एकत्रित बैठकीची विनंती केली. नंतर उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल, असे ठरले. सायंकाळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कोल्हापूरचे अधिकारी पी. डी. पंदरकर यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. जनतेचा उद्रेक होऊ नये म्हणून बैठकीत निर्णय होईपर्यंत उद्यापासून होणारी टोलवसुली स्थगित केली आहे, अशी माहिती वैशाली राजमाने यांनी दिली.