Monday, September 15, 2025

'देवदूत' कल्पेश ठाकूरचा आदर्श तरुणांनी घ्यावा

'देवदूत' कल्पेश ठाकूरचा आदर्श तरुणांनी घ्यावा

पेण (वार्ताहर) : स्वतःचा व्यवसाय सांभाळून मागील १७ वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त प्रवाशांसाठी विनामूल्य सेवा देणाऱ्या कल्पेश ठाकूरसारख्या ध्येयवेड्या तरुणांमुळे समाजाचे भले होऊन इतिहास रचला जातो, तरुणांनी कल्पेशचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पेण येथे पोलीस मदत केंद्र व सीसीटीव्ही उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले.

दादर सागरी पोलिसांनी मुंबई - गोवा महामार्गावरील आंबिवली येथे उभारलेल्या पोलीस चौकी तसेच महामार्गावर बसविलेल्या सीसीटीव्हीचे उद्घाटन अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण, पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार, दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, उद्योजक यशवंत घासे, कोपर सरपंच नवनाथ म्हात्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी, ग्रामसुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते. यावेळी कल्पेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.

अशोक दुधे पुढे म्हणाले, गुन्हे रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात सीसीटीव्हीचे जाळे उभारणार आहे. अनेक आव्हानांचा सामना पोलीस कर्मचारी करत असतो. मुंबईमध्ये फक्त दोन तास ट्राफिक सिग्नलला उभे राहून दाखवा असे सांगताना आमचा कर्मचारी ऊन, वारा, पाऊस, धूळ, प्रदूषण यांचा सामना करत बारा बारा तास उभा असतो. ग्रामसुरक्षा दलात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही दुधे यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment