Sunday, June 15, 2025

लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच येणार

लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच येणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले होते. राज ठाकरे यांचा भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरण चांगलाच गाजत असतानाच आता लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा आणणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केल्याने हा मुद्दाही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.


२०२१ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे १ अब्ज ३४ कोटी आहे आणि येत्या २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता लोकसंख्या हे भारतासमोर खुप मोठे आव्हान आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. छत्तीसगडमधील रायपूर येथे एका संमेलनादरम्यान ते बोलत होते.


मागील कित्येक दिवसापासून लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा आणण्याची मागणी जोर धरुन आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उडी घेतल्यानंतर आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.


एका जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले होते. याला राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. आता याचाच प्रभाव म्हणावा की काय, आता केंद्र सरकार लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिली.

Comments
Add Comment