Monday, September 15, 2025

ठाणे महापालिकेत प्रस्थापितांना धक्का

ठाणे (प्रतिनिधी ) : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रस्थापितांना धक्का बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना दिग्गजांना काही प्रमाणात धक्का बसला आहे. यामध्ये माजी महापौर, उपमहापौर तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दिग्गज नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. मात्र असे असले तरी, प्रभागांची मोडतोड झाल्याने या प्रस्थापित माजी नगरसेवकांना अन्य प्रभागात पर्याय उपलब्ध असल्याने त्यांची चिंता मिटली आहे.

ठाणे महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, देवराम भोईर, सुहास देसाई, भाजपचे मनोहर डुंबरे आदींसह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते. प्रभाग आरक्षणात अनेक दिग्गजांना फटका बसेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात आरक्षण सोडतीनंतर उपस्थितांसह अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. काही प्रभाग असे झाले आहे की, त्याठिकाणी प्रस्थापितांना तर संधी मिळणार आहेच, शिवाय त्यांच्या कुटुंबातील इतरांनादेखील तिकीट मिळावे यासाठी संधी उपलब्ध झाली आहे, तर काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांना संधी नाही, असे चित्र दिसत असले तरी प्रभागांची मोडतोड झाल्याने त्यांना इतर प्रभागात संधी उपलब्ध झाली आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये तीनपैकी दोन वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नरेश मणेरा आणि सिद्धार्थ ओवळेकर यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार आहे. परंतु दुसरीकडे प्रभाग क्रमांक पाचमध्ये मात्र यातील एकाला संधी उपलब्ध होणार आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला किंवा सुहास देसाई यापैकी एकालाच संधी मिळणार आहे. परंतु याठिकाणी महिलांसाठी आरक्षित झालेल्या वॉर्डात दोघांपैकी एक जण आपल्या पत्नीला संधी देऊ शकणार आहेत. प्रभाग क्रमांक २७ मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि पुरुष असे आरक्षण आल्याने याठिकाणी तत्कालीन महापौर नरेश म्हस्के आणि विकास रेपाळे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. त्यामुळे या एका जागेसाठी रेपाळे यांना माजी महापौरांशी समझोता करावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकेल.

प्रभाग क्रमांक २९ मध्ये माजी उपमहापौर पल्लवी कदम यांना मात्र धक्का बसल्याचे दिसून आले आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (महिला) आणि पुरुष असा आरक्षित झाल्याने पल्लवी कदम यांचा पत्ता कट झाला आहे. परंतु त्यांचे पती पवन कदम यांना संधी मिळू शकणार आहे.

Comments
Add Comment