मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. वाझेने माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाने स्वीकारला आहे.
सचिन वाझेला बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले. आगामी ७ जून रोजी वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे नेण्यात येणार आहे. त्यानंतर वाझे याला नियमीत जामीनासाठी अर्ज करण्याची मुभा राहिल. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.
तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात ४ एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितले होते.