नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला संघाने मंगळवारी अजरबैजानमधील बाकू येथे आयोजित ‘आयएसएसएफ’ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. रमिता, ईलाव्हेनिल वालारिवान आणि श्रेया अग्रवालने अचूक नेम साधून महिलांच्या सांघिक १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेत भारताच्या पदकांचे खाते उघडले.
भारतीय महिला संघाने फायनलमध्ये डेन्मार्कचा १७-५ ने पराभव केला. त्यामुळे भारतीय महिला संघाला सोनेरी यश संपादन करता आले. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला त्रिकुटाने डेन्मार्कच्या अॅना निलसन, एमा कूच आणि रिकी माएंग इब्सनला १७-५ असे नमवले. या गटात पोलंड महिला संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलसह पार्थ मखिजा आणि धनुष श्रीकांत हे एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये चौथ्या स्थानी राहिले. भारताच्या पुरुष संघाला या गटाच्या लढतीत क्रोएशियाकडून पराभव पत्कारावा लागला.
माजी अग्रमानांकित वालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती. भारतीय महिलांनी पहिल्या टप्प्याच्या पात्रता फेरीत ९० फैरींमध्ये ९४४.४ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डेन्मार्कपाठोपाठ दुसरे स्थान मिळवत भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.