Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाअंतिम फेरीतून भारत बाहेर

अंतिम फेरीतून भारत बाहेर

आता कांस्यपदकासाठी जपानविरुद्ध लढत

जकार्ता (वृत्तसंस्था) : गतविजेत्या भारताला आशिया कप हॉकीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. मंगळवारी विजय गरजेचा असलेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण कोरियासोबत ४-४ अशी बरोबरी साधली. या ड्रॉमुळे नवव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता. या सामन्याने २०१३ची आठवण करून दिली. जेव्हा याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा दक्षिण कोरियाकडून ४-३ असा पराभव झाला होता. या ड्रॉसह कोरियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी त्यांचा सामना मलेशियाशी होणार आहे. त्यांनी जपानचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरीत आधीच आपले स्थान निश्चित केले होते. आता बुधवारी तिसऱ्या स्थानासाठी भारताचा जपानविरुद्ध सामना होणार आहे.

या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोघांनीही पहिल्यापासून जोरदार सुरुवात केली. याचा फायदा भारताला ८व्या मिनिटाला मिळाला. जेव्हा संदीपने पेनल्टीवर पहिला गोल केला. मात्र, भारताचा आनंद फार काळ टिकला नाही आणि कोरियाच्या जोंग जोंगह्युंगने १२व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. या स्कोअरवर काही काळ खेळ चालला. त्यानंतर १७व्या मिनिटाला दक्षिण कोरियाच्या जी वू चेनने मैदानी गोल करत आपल्या संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटांनंतर मनिंदर सिंगने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले आणि स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला. पुढच्याच मिनिटाला महेश शेष गोंडा याने गोल करत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. पण २७व्या मिनिटाला किम जोंग होने मैदानी गोल करून स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला. हाफ टाइमपर्यंत हाच स्कोअर होता.

सामन्याच्या उत्तरार्धात एस मारीस्वरामने भारतासाठी आणखी एक गोल केला. या गोलमुळे भारताने सामन्यात ४-३ अशी आघाडी घेतली होती. पण जोंग मोंजने ४३व्या मिनिटाला भारताविरुद्ध गोल करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. शेवटच्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. २०१७मध्ये भारताने शेवटचा अंतिम सामना खेळला होता, तेव्हा त्यांनी मलेशियाला २-१ ने पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. त्याआधी, भारताने २०१३, २००७, २००३, १९९४, १९८९, १९८५ आणि १९८२ या हंगामात स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यापैकी टीम इंडियाने २०१७, २००७ आणि २००३ मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील एकूणच हा सहावा अनिर्णित सामना आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या या स्पर्धेत दोघांनी १-१ अशी बरोबरी साधली होती. दोन्ही संघ २७ वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी भारताने १२ सामने जिंकले आहेत, तर १० सामन्यांत संघाचा पराभव झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -