मुंबई (प्रतिनिधी) : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही ठिकाणी राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटांसह पावसाला सुरुवात झाली असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, बीडसह, वर्धा, उस्मानाबाद, नजीकच्या शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
या संपूर्ण आठवड्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागांतही पुढच्या ४ दिवसांत गडगडाटांसहसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात मंगळवारी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढग दाटून आले असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
शेतीच्या कामांना वेग
दरम्यान, राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.