Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरबोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

बोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

महसूल विभागाची कारवाई; धनानीनगर, कृष्णानगर, दांडीपाडा येथील शासकीय-आदिवासी जागेवर फिरवला जेसीबी

बोईसर (वार्ताहर) : बोईसर महसूल विभागाने धनानीनगर, कृष्णानगर, दांडी पाडा येथील शासकीय तसेच आदिवासी जागेवरील एकूण तीन ठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारून बांधकामे निष्कासित करून कारवाई केली. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे पाडली. या कारवाईने शासकीय भूखंड तसेच आदिवासींच्या जागेवर अनधिकृतरीत्या बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे येथील परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे. यातच भूमाफियांकडून शासकीय भूखंड मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आले असून, त्यावर गाळे व चाळी बांधल्या आहेत. परप्रांतीय तसेच बिगर आदिवासींकडून आदिवासींना विविध आमिषे दाखवून त्यांच्या जमिनी कवडी मोलाने वाणिज्य वापरासाठी घेतल्या आहेत. मुळात आदिवासींना शेती करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीवर परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात चाळीच्या चाळी व गाळ्याचे अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. याबाबत अनेक तक्रारी महसूल कार्यालयात केल्या होत्या. त्या आनुषंगाने खुद्द तहसीलदार सुनील शिंदे यांनी हजेरी लावत ही बांधकामे जमीनदोस्त केली.

बोईसर परिसराच्या काटकर पाडा येथील आदिवासी जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सुमारे २० खोल्या भुईसपाट केल्या. धनानी नगरमधील खासगी जागेवरील आणि दांडीपाडा येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण निष्कासित केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी नायब तहसीलदार किशोर तरंगे, बोईसरचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक, तारापूर मंडळ अधिकारी अनिल वायाल, तलाठी हितेश राउत, संजय चुरी, उज्ज्वला पाटील, साधना चव्हाण, सोपान पवार, अनंता पाटील आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -