Wednesday, July 24, 2024
Homeदेशसोनिया आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस; ८ जूनला होणार चौकशी

सोनिया आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस; ८ जूनला होणार चौकशी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसने हे सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही या ईडीच्या नोटीशीला घाबरणार नाही आणि केंद्र सरकारसमोर झुकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला आहे की, “यापूर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजपा राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहेत.”

यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्यांच्याकडून आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर चौकशी करण्यात आली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी चौकशीला सामोरे जाणार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. आठ जूनपर्यंत राहुल गांधी परतल्यास तेही चौकशीला सामोरे जातील. अन्यथा ईडीकडे वेळ मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरजेवाला यांची ईडीवर टीका

पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी ईडीवर निशाणा साधला. या कटामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची पाळीव यंत्रणा ईडी आहे. सूडाच्या भावनेत मोदी सरकार आंधळी झाली असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र १९४२ मध्ये स्थापन करण्यात आले होते. त्यावेळेस ब्रिटीश सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आणि आता मोदी सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी समोर हजर न राहण्याचा पर्याय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर आहे. पहिल्या नोटीसला उत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष करता येईल. अशा स्थितीत ईडीकडून त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात येईल. दुसरा पर्याय म्हणजे ईडीच्या नोटिशीला कोर्टात आव्हान देण्याचा मार्ग त्यांच्यासमोर आहे.

असे आहे प्रकरण…

‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केले होते. हे काँग्रेसचे मुखपत्र समजले जायचे. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडले. मात्र, २०१२ मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरू करण्यात आले नव्हते. हे हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -