मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधीत ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबईच्या उच्च न्यायालयाने एका आठवड्यासाठी विदेश प्रवासासाठी मंजूरी दिली आहे. अबुधाबी येथे होणाऱ्या आयआयएफए सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोर्टाने तिला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देताना तिला अबुधाबी येथील भारतीय दूतावासात दररोज हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच हजेरीची शीट ६ जून रोजी न्यायालयात सादर करावी लागणार आहे.
तसेच अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून रियाला न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये १ लाख रुपये जमा करावे लागणार आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात रियाला अटक केली होती आणि तिचे पासपोर्टही जप्त करण्यात आले होते. यावर रियाच्या वकिलांनी न्यायालयात आबुधाबी येथे होणाऱ्या आयआयएफए पुरस्कारांसाठी २ ते ८ जून दरम्यान आबुधाबी जाण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
आबुधाबी येथे आयआयएफएचे निदेशक आणि सह-संस्थापकांनी रियाला ग्रीन कार्पेटवर वॉक करिता तसेच ३ जून २०२२ रोजी एक पुरस्कार देण्यासाठी आणि ४ जून रोजी मुख्य पुरस्कार वितरण सोहळ्यातील एका कार्यक्रमाच्या अँकरिंगसाठी निमंत्रित करण्यात आले असल्याचे रियाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
सध्या सुरु असलेल्या गुन्हेगारी प्रकरण आणि परिस्थितीमुळे आधीच रियाच्या करिअरमध्ये खुप अडथळे येत आहेत. तिला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागले आहे. अशा प्रकारच्या संधीमुळे तिच्या अभिनयाच्या करिअरसाठी हे महत्वाचे टप्पे आहेत. शिवाय रियाचे वृद्ध आई-वडील देखील आर्थिक बाबींसाठी तिच्यावरच अवलंबून असल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. ही मागणी न्यायालयाने मान्य करुन तिला पाच जूनपर्यंत पासपोर्ट वापरण्याची परवानगी दिली आहे. तसेच सहा जून रोजी पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.