Tuesday, April 22, 2025
Homeविदेशबोपण्णाने फ्रेंच ओपनमध्ये रचला इतिहास

बोपण्णाने फ्रेंच ओपनमध्ये रचला इतिहास

पहिल्यांदाच पुरुष दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये केला प्रवेश

पॅरिस (वृत्तसंस्था) : भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने इतिहास रचला आहे. त्याने टेनिस ग्रँड स्लॅम फ्रेंच ओपनमध्ये पहिल्यांदाच पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. ४२ वर्षीय बोपण्णा आणि त्याचा डच जोडीदार मॅटवे मिडेलकूप यांनी उपांत्यपूर्व फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला. या इंडो-डच जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर ब्रिटनच्या लॉयड ग्लासपूल आणि फिनलंडच्या हेन्री हेलिओव्हारा यांचा ४-६, ६-४, ७-६ असा पराभव करून पुरुष दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

हा सामना दोन तास चार मिनिटे चालला. या विजयासह बोपण्णा आणि मिडेलकप या १६व्या मानांकित जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. रोहन बोपण्णाने २००८ मध्ये पहिल्यांदा फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता. तेव्हापासून तो दर वर्षी पुरुष दुहेरी स्पर्धेत भाग घेतो, पण उपांत्य फेरीत कधीही पोहोचू शकलेला नाही. २०११, २०१६, २०१८ आणि २०२१ मध्ये तो जोडीदारासह उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेला आहे.

भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि डच खेळाडू एम. मिडेलकूप यांनी गेल्या ७ वर्षांतील पहिली ग्रँड स्लॅम उपांत्य फेरी गाठली आहे. ७ वर्षांपूर्वी बोपण्णाने २०१५ विम्बल्डनमध्ये रोमानियाच्या फ्लोरिन मेर्जियासह उपांत्य फेरी गाठली होती, जिथे त्याला जीन-ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊ या जोडीने पराभूत केले होते. उपांत्य फेरीत ४२ वर्षीय बोपण्णा आणि ३८ वर्षीय मिडेलकप आता २ जून रोजी १२व्या मानांकित मार्सेलो अरेव्हालो आणि जीन-ज्युलियन रॉजरशी खेळतील. पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णा आणि मिडलकूपने जोरदार पुनरागमन करत दोन्ही सेट जिंकले. त्यांनी शनिवारी विम्बल्डन चॅम्पियन जोडी मेट पेविच आणि निकोला मेक्टिक यांचा पराभव केला होता.

रोहनने आतापर्यंत पुरुष दुहेरीत एकही ग्रँडस्लॅम जिंकलेले नाही. त्याने २०१० मध्ये यूएस ओपनमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा बोपण्णा आपल्या पाकिस्तानी जोडीदारासह अंतिम फेरीत पोहोचला होता, पण ब्रायन बंधू बॉब आणि माईक यांच्याविरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. सोळाव्या मानांकित बोपण्णा व मिडलकूप यांनी फ्रेंच ओपनमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

तत्पूर्वी गुरुवारी फ्रेंच ओपनमध्ये टेनिस दिग्गज राफेल नदालने ३००वा ग्रँडस्लॅम सामना जिंकला. ३०० ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याचा विशेष विक्रम करणारा नदाल हा केवळ तिसरा टेनिसपटू ठरला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -