
मुरुड (वार्ताहर) : १ जूनपासून सरकारने मासेमारी करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मुरुड बंदरामध्ये मच्छीमार बांधवांनी आपापल्या नौका शाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुरुड समुद्रकिनारा कोळी बांधवांनी गजबजून गेला आहे. तालुक्यातील असंख्य नौका आता तब्बल दोन महिन्यांची विश्रांती घेणार आहेत.
जून-जुलै हा महिना माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा कालावधी असल्याकारणाने या दोन महिन्यात माशांच्या उत्पादनात वाढ होत असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणारा मच्छीमार आपल्या नौका शाकारुन त्यांच्या डागडुजी करून पुन्हा मासेमारीसाठी सज्ज करीत असतो. ३१ जुलैपऱ्यंत मासेमारी व जलवाहतूकबंदी घातली असल्याकारणाने मच्छीमार या कालावधीत नौका किनाऱ्यावर शाकारतात. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या नौकांची दुरुस्ती, रंगरंगोटी व नवीन जाळी तयार करणे, जुनी जाळी दुरुस्ती करणे या कामात व्यस्त असतात.
खरं तर दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जाते पण इतर राज्यांतील बंदी १ ऑगस्ट रोजी उठत असल्याने परराज्यातील मच्छीमार या ठिकाणी येऊन मच्छिमारी करतात त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे देशभरात सर्व समुद्रकिनारी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मच्छीमारी बंदी घातली आहे. जीवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजीविका करणाऱ्या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठे परकीय चलन मिळते.