मीनाक्षी जगदाळे
आजपर्यंतच्या विविध लेखांमार्फत, समुपदेशनामार्फत आपण संसार टिकविणे, त्यासाठी तडजोड करणे, स्वतःच्या वागणुकी, वृत्ती, सवयी इत्यादींमध्ये बदलणे यावर भाष्य करीत आलो आहोत. समजूदारपणा, त्याग, माघार घेण्याची तयारी यशस्वी प्रापंचिक आयुष्याची गुरुकिल्ली आहे. या विचारांना धरून अनेक तुटत आलेले संसार वाचवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. थोडेफार गैरसमज, थोडा वादविवाद मतभेद प्रत्येक कुटुंबातील पतीपत्नीमध्ये असतात आणि ते स्वाभाविक आहे. अनेकदा टोकाच्या भूमिका संसार तोडण्याची तयारी ठेऊन घेतली जाते. पण त्यातून सुद्धा सकारात्मक मार्ग काढून पती-पत्नी एकत्र येऊन नांदत असतात, कारण तेवढी वैचारिक, मानसिक तयारी ते स्वतःची करतात.
तरीही आता समाजात सुरू असलेला संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा विषय म्हणजे पती-पत्नींनी एकमेकांचा जीव घेणे. त्यामुळे आज या लेखामार्फत एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत.
आजही समाजात पती-पत्नींनी एकमेकांना जीवे मारणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, प्रियकर अथवा प्रेयसीच्या मदतीने आपल्या जीवनसाथीला संपवणे, कुटुंबाच्या साथीने, मित्र-मैत्रणीच्या सल्ल्याने आपल्या जोडीदाराला ठार मारणे या घटना घडत आहेत. सुनेला हुंडाबळी म्हणून मृत्यू स्वीकारावा लागणे, सुनेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणे अशा बातम्या सातत्याने आपण वाचत असतो. विवाहितांच्या असहाय छळामुळे होणाऱ्या आत्महत्या किंवा पतीची मुला-बाळासह आत्महत्या हादेखील समाजातील धगधगणारा विषय आहे. एकमेकांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याइतका मानसिक, शारीरिक आर्थिक त्रास देणे आणि त्याला स्वतःचे आयुष्य नकोसे होण्यासाठी कारणीभूत होणे ही पती-पत्नीच्या नात्यातील काळी आणि लाजीरवाणी बाजूसुद्धा आपल्याला पाहायला मिळते.
आपल्या न्यायप्रक्रियेमध्ये कायदेशीर विवाहबंधनाला जसं महत्त्व आहे आणि त्यामार्फत आपण एक सुरक्षित वैवाहिक आयुष्य जगू शकतो आहोत त्याचप्रमाणे कायद्याने पती-पत्नींना विभक्त होण्याचा हक्क आणि अधिकारदेखील दिलेला आहे. अथक प्रयत्न आणि अनेक प्रकारची तडजोड करूनही जर वैवाहिक आयुष्य रुळावर येत नसेल, परिस्थिती बदलतच नसेल, तर एकमेकांच्या जीवावर उठण्यापेक्षा गोडीत वेगळे होऊन आपल्या आयुष्याला नवीन वळण, नवीन दिशा देणे कधीही उचीत राहील, असे वाटते. कोणताही अन्याय, अत्याचार वर्षांनुवर्षे सहन करीत राहणे आणि त्याचा अंत कोणाच्या तरी जीव घेण्यात अथवा जीव देण्यात होणे यासारखी शोकांतिका नाही. समाज काय म्हणेल, मुलांच्या भविष्याचे काय होईल, घरातील सदस्य फारकतीसारख्या कोणत्याही निर्णयात साथ देतील का, विभक्त झाल्यावर आर्थिक, शारीरिक गरजा कशा पूर्ण होतील? यासारख्या अनेक प्रश्नांमुळे पती-पत्नी टोकाचे वाद विवाद, कलह आपापसांत असूनसुद्धा एकत्र राहतात.
एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेष, मत्सर, तिरस्कार मनात असताना एका घरात राहून वारंवार खटके, भांडण करतसुद्धा एकत्र राहण्यात खरे तर काहीही अर्थ राहिलेला नसतो. सातत्याने संशय आरोप प्रत्यारोप धुसफूस, चिडचिड यातून दोघांचीही मानसिकता दिवसेंदिवस ढासळत जाते आणि त्याची परिणीती आयुष्याचा शेवट होणे अशी होते.
समोरच्याची आपल्या सोबत राहायची इच्छा नसतानादेखील अनेकदा एकमेकांना अद्दल घडविण्यासाठी, एकमेकांना बदनाम करून आसुरी आनंद मिळवण्यासाठी दाम्पत्य मारून-मुटकून एका घरात राहतात. समोरून घटस्फोटाची मागणी होत असतानाही एकजण तयार होत नाही. बहुतांश महिला स्वतःला अपेक्षित ती रक्कम जोपर्यंत पती फारकतीच्या बदल्यात देणार नाही, तोपर्यंत त्याला सोडायला तयार होत नाहीत आणि त्यामुळे वर्षांनुवर्षे एकमेकांचा मत्सर करत नाईलाजास्तव पती-पत्नी एकत्र राहतात असे दिसते. मुळात संसार, प्रापंचिक आयुष्य हा कोणावरही जबरदस्तीने लादण्याचा विषय नाही. ज्यावेळी अशा धगधगणाऱ्या सहजीवनातील सहनशक्तीचा स्फोट होतो, परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा हे पती-पत्नी एकमेकांना ठार मारायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत. परस्परांना आपल्या सुखातील काटा, अडथळा समजून अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत म्हणवणारे नवरा-बायकोसुद्धा यासारख्या गुन्हेगारी वृत्तीकडे वळताना दिसतात.
अशा कृत्यांमुळे कुटुंबातील चांगल्या निरपराध लोकांनादेखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आणि मुलांचं भवितव्य पूर्णतः धोक्यात येते. एकमेकांना आत्महत्येला प्रवृत्त करून स्वतःचा बचाव करणे, जोडीदाराचा परस्पर काटा काढणे आणि मग स्वतःच्या मर्जीनुसार आयुष्य जगावे, असा खालच्या पातळीचा विचार आणि त्यानुसार नियोजन करणारे विकृत मानसिकतेचे लोक आपल्याच आजूबाजूला वावरताना दिसतात. या सर्व चुकीच्या वागणुकीपेक्षा सामंजस्याने कायदेशीर विभक्त होणे दोघांसाठी योग्य राहील, असे वाटते.
एकमेकांना आयुष्यातून उठवणे, बरबाद करणे, बदला घेणे, एकमेकांच्या जीवावर उठणे आणि कायमस्वरूपी संपविणे या विकृत आणि गुन्हेगारी मानसिकतेमधून एकमेकांची हत्या केली जाते, आत्महत्या घडवून आणली जाते. दोघांपैकी एकाचा जीव तर जातोच. पण असा गुन्हा करणारा, त्याला साथ देणारेदेखील कधीही या गंभीर गुन्ह्यामधून सहीसलामत सुटू शकत नाही. सगळ्यांनाच कायदेशीर कठोर शिक्षा भोगावीच लागते आणि उर्वरित आयुष्य पूर्णतः नष्ट होते. या सर्व घडामोडीमध्ये पाल्यांचे भविष्य तर पणाला लागतेच, मुलं पोरकी होतात, कुटुंबाची मानहानी होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक, मानसिक त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो.
आयुष्यभर गुन्हेगार म्हणून, गुन्हेगाराचे कुटुंब म्हणून समाजातील इज्जतही धुळीला मिळते. भविष्यातील करिअर, दुसरा विवाह होणे यामध्ये प्रचंड अडचणी निर्माण होतात. अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त पती-पत्नींमध्येच पाहायला मिळते असे नाही, तर कौटुंबिक कलहामधून जावयाने सासऱ्याची हत्या करणे, सासूने जावयाला संपवणे, भावाने बहिणीच्या नवऱ्याला जीवे ठार मारणे, पत्नीच्या अथवा पतीच्या नातेवाइकांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला करणे यांसारखे प्रकार राजरोस घडताना दिसतात. त्यामुळेच पती अथवा पत्नी यांनी आपले सहजीवन जर सावरण्याच्या आणि सुधारण्याच्या पलीकडे गेलेले असेल, तर परस्पर समजुतीने वेगळे होणे केव्हाही उचीत राहील, असे वाटते.
meenonline@gmail.com
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…