मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होताना पाहायला मिळत होती. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजनाही केल्या होत्या. त्यानंतर आता पालिका शाळांना चांगले दिवस आले असल्याचे पाहायला मिळत आहे, तर आतापर्यंत सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर शाळांची डागडुजी करून आधुनिकीकरण देखील केले. शाळांच्या इमारती आकर्षक केल्या गेल्या तसेच शाळेत आधुनिक शिक्षण, डिजिटल शिक्षण देखील सुरू केले आणि यामुळे हळूहळू पुन्हा पालक या शाळांकडे वळू लागले आणि आपल्या मुलांचे प्रवेश पालिकेच्या शाळांमध्ये करण्यास सुरुवात केली.
यामुळे गेल्याकाही वर्षांपासून असलेले पालिकेच्या शाळेतील चित्र बदलू लागले असून याआधी शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांमध्ये २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर या वर्षी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
दरम्यान पालिकेच्या शाळा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषांमध्ये आहेत, तर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर विद्यार्थ्यांना पालिकेकडून विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू तसेच टॅब वाटपही केले जाते, तर वर्चुअल क्लासच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.