अतुल जाधव
ठाणे शहरातील महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण… म्हणजे येऊर… ठाणे शहराचा अविभाज्य भाग असलेल्या या येऊरला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊर या ठिकाणी निसर्गाने दिलेली मुबलक वनसंपदा त्याचप्रमाणे येथील जंगलाचा एक हिस्सा असलेल्या आदिवासीं पाड्यामुळे प्रसिद्ध होते; परंतु आता ही ओळख पुसली जात असून आदिवासी पाड्यांना खेटून बांधण्यात आलेल्या राजकारणी पुढाऱ्यांच्या बंगल्यामुळे येऊर ओळखले जात असून धनदांडग्यांचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीसाठी असलेली हॉटेल्स येऊरची नवीन ओळख आहे.
यंदा पाऊस मुबलक पडूनदेखील या ठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत असून हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे; परंतु या ठिकाणी असलेला विरोधभास हा चटका लावणारा असून एकीकडे आदिवासी बांधव पाण्याच्या एका थेंबाला महाग झाले असताना राजकारण्यांच्या बंगल्यांत मात्र तरणतलाव ओसंडून वाहत आहेत आणि आलिशान हॉटेल्समध्ये चोवीस तास पाण्याचे नळ वाहत असल्याने एक प्रकारे येथील मूळ आदिवासी आसलेल्या या भूमीचा मालक असलेला बांधव मात्र पाण्याच्या थेंबाला महाग झाला आहे.
या ठिकाणी अडलेल्या पाण्यावर आदिवासींचा हक्क असून त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लागत आहे.
अतिशय दुर्गम आदिवासी परीसर ते ठाण्यातील उच्चभ्रू नागरिकांचे फिरण्यासाठी आवडते ठिकाण आणि त्यातूनच एक पर्यटन स्थळ म्हणून झालेला या परिसराचा विकास येथील आदिवासींच्या अस्तित्वालाच बाधक ठरत आहेत.
नाही म्हणायला थोडासा रोजगार मिळाला पण त्यासाठी त्यांची आदिवासी म्हणून पारंपरिक ओळख मात्र पुसली जात आहे. येऊर प्लॅस्टिक बॉटलमध्ये मिळणाऱ्या पाण्याची हजारो रुपयांची विक्री येथील हॉटेलात दामदुप्पट भावात होते; परंतु मातीच्या घरात राहणाऱ्या मातीच्या मडक्यात पाणी पिणाऱ्या आदिवासी बांधवांच्या घरात मात्र पिण्यासाठी पाणी नाही, हे येथील वास्तव आहे.
येऊर प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे आवडीचे स्थळ आहे. प्रशासकीय अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून भव्य बंगल्यांची उभारणी केली गेली आहे. २००९ मध्ये जेमतेम १३४ बंगले असलेल्या या भागात २०२० पर्यंत ५००हून अधिक बांधकामे उभारण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात नव्या बांधकामांची गती अधिक वेगाने वाढून स्पोर्ट्स क्लब, टर्फ क्लब, रेस्टॉरन्ट, रिसॉर्ट आणि हॉटेलांची संख्या कमालीची वाढली आहे. या सर्व बांधकामांना पाणी कुठून मिळते? त्यासाठी इतक्या प्रमाणात बोअरवेल खणल्या जातात का? तसे असेल, तर त्यासाठी वन विभाग किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली जाते का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ठाणे महापालिकेकडून शहरात पाणीटंचाई जाणवते म्हणून मोठ्या गृहप्रकल्पांना मान्यता देताना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले आहे. मग येऊर परिसरात डोंगर उतारावरून पाणी वाहते ते बांध घालून का अडवले जात नाही? असा प्रश्न येथील स्थानिक विचारत आहेत. त्याचप्रमाणे बंगले, हॉटेल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही व मोठ्या प्रमाणात बोअरवेल होत असताना त्या रोखल्या का जात नाही?, हा त्यांचा प्रश्न आहे.
असंवेदन प्रशासन
येऊर परिसरातून ठाणे महापालिकेला एक रुपयांची देखील पाणीपट्टी मिळत नसतानाही महापालिका अधिकाऱ्यांचे येऊरवर विशेष प्रेम आहे.
येऊर वनक्षेत्राच्या हद्दीत भारतीय हवाई दलाची वसाहत असून या वसाहतीसाठी विशेष पाण्याची टाकी देण्यात आली आहे. हवाई दलाशी झालेल्या करारानुसार त्यांना मोबदल्यासह पाणीपुरवठा केला जातो. येऊर हा आदिवासी भाग असल्याने करारानुसार प्रत्येक पाड्यामध्ये एका मोफत सार्वजनिक नळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात या माध्यमातून येणाऱ्या पाण्यावर अनधिकृतपणे येथील अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या बांधकामांकडून डल्ला मारला जात आहे. जी पाइपलाइन आदिवासींसाठी आहे, त्या पाइपलाइनला अनधिकृतपणे नळ जोडणी करून पाणी चोरले जात आहे.
येऊर परिसरात सर्व हॉटेल, बंगले मालक फुकट पाणी वापरतात, असाच निष्कर्ष निघतो यांच्यावर महापालिकेने काय कार्यवाही केले हादेखील प्रश्नच आहे. एरव्ही छोट्या मोठ्या प्रश्नांवर सभागृह डोक्यावर घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील यासंदर्भात मौन बाळगलेले दिसत आहेत.
येऊरचे रहिवाशी हे देखील ठाण्याचे अविभाज्य नागरिक असून त्यांना सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी मिळणे हा त्यांचा हक्क आहे; परंतु असंवेदनशील महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला संवेदनशीलता शिकवावी लागणार असून नंतर येऊरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध पर्याय आहेत. त्यांची अंमबजावणी करण्यासाठी आदिवासी बांधवांच्या मागे सर्व ठाणेकरांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.